आश्विनी भोईर
नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात अत्यंत बिकट परिस्थिती असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारी घेतली जात असताना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, उद्योगसमुह यांना केलेल्या सहकार्याच्या आवाहनास अनुसरून मदतकार्यास सुरूवात झाली असून एल अँड टी उद्योगसमुहाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे १५ हजार डिस्पोजिबल मास्क तसेच ५०० विशेष ‘एन ९५’ मास्क आणि १०० बॉटल्स फिनाईल तात्काळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
कन्सर्न इंडिया या उद्योगसमुहाच्या वतीनेही १२०० बॉटल्स सॅनिटायझर्स व १० हजार डिस्पोजेबल मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे भिवंडी येथील गोकुळ विराज फाऊंडेशन यांच्या वतीने १५०० ट्रिपल लेयर मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. माजी नगरसेवक भरत जाधव यांनीही २००० नग रियुजेबल मास्क उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच हार्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून क्वारंटाईन सेंटरसाठी ५५० बेडस उपलब्ध करून घेण्यात मोठी मदत झाली आहे.
सर्व नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करीत शहराच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा अशा अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत सुरक्षा साधनांची (PPE) अधिक गरज असल्याचे लक्षात घेऊन सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचेकडून ही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त संस्था, नागरिक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणारी साधन सामुग्री योग्य व्यक्तींपर्यंत योग्य मार्गाने पोहचविणे देखील महत्वाचे असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे विविध स्वरूपाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, उद्योग समूह, सहकार क्षेत्र यामधील विविध संस्थांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठीच्या या लढाईत स्वयंस्फुर्तीने पुढे येत मास्क, एन ९५ मास्क, एनआरएम ऑक्सिजन मास्क, हॅँड ग्लोव्हज, लिक्विड सोप, सॅनिटायझर, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू, याशिवाय व्हेंटिलेटर्स, उशी व चादरींसह बेड्स, नॅपकीन, टॉवेल्स, साबण, सक्शन मशीन, पीपीई किट्स, मेडिकल किट्स, इन्स्टन्ट गिझर अशी नवीन साधने याप्रकारचे सहकार्य करावे असे आवाहन आहे.
त्याचप्रमाणे विविध रक्तगटांच्या रक्तदात्यांचीही गरज भासणार असून रक्तदान करण्याकरिता नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवक / मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ स्वरुपातील मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणावर गरज भासेल, त्यावेळी काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आहे. वरीलपैकी कोणत्याही प्रकारची मदत करू इच्छित असल्यास त्यांनी ती मदत १८००२२२३०९ / १८००२२२३१० या टोल फ्री क्रमांकावर कळवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातूनच करावी असे सूचित करण्यात येत आहे. जेणेकरून योग्य माणसांपर्यंत मदत पोहचविणे सोयीचे ठरेल व कोरोनाचा प्रसार रोखण्याची काळजी घेत त्याठिकाणी गर्दी न होता ठराविक सामाजिक अंतर (Social Distancing) राखून साहित्य वितरणाची कार्यवाही करता येईल. तरी कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी नागरिकांनी १८००२२२३०९ / १८००२२२३१० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संबंधितांशी संपर्क साधून साहित्य संकलन व वितरण याची सुयोग्य कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आहे.