बऱ्याच गोष्टी लिहिण्यासाठी आहेत. पण खरं सांगतो वाचक म्हणून पेपर उघडून वाचण्यात जी मज्जा आणि समाधान आहे, ते ई-पेपरमध्ये नाही, पण आपले म्हणणे मांडणे पण तितकेच महत्वाचे आणि गरजेचे आहे. त्यातही महाराष्ट्राची कोरोनाची आकडेवारी बघता महाराष्ट्र सरकार कितपत सक्षम आहे ही परिस्थिती हाताळण्यात! त्यावर संपूर्ण आता भारतात प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. पण सुदैवाने नवी मुंबई भाजपा नेतृत्वाने आणि पालिकेने , अर्थात मा. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि नगरसेवकांनी ज्या पध्दतीने नवी मुंबई हाताळली आहे. ते बघता महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई पॅटर्नचा अभ्यास करून महाराष्ट्रात राबवल्यास योग्य होईल. नवी मुंबईत कोरोनाला आवरते घेण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनास २३ मार्चपासून सुरूवात झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि त्यातही नवी मुंबईला हाताळणे सोपे तर नक्कीच नव्हते. समुद्रापलिकडे कोरोनाची हवा असलेली मुंबई, दुसरीकडे लॉकडाऊन न पाळणारे कळवा-मुंब्रा, तिसरीकडे नवीनच झालेली पनवेल महानगरपालिका आणि चौथीकडे एअरपोर्ट व बांधकाम क्षेत्राचे काम चालू असलेले उलवे. त्यातही नवी मुंबईतला मुंबई-पुणे रस्ता आणि पनवेल-उरण रस्ता लॉकडाऊन सक्षमतेने यशस्वी होण्यास अडथळे निर्माण करण्यास उभा होता. त्यात नवी मुंबईमध्ये सुध्दा बऱ्यापैकी राजकीय कुरघोडी निवडणूकीमुळे सुरूच आहेत. परंतु सुदैवाने नवी मुंबईचे ज्या पध्दतीने राजकीय आणि सामाजिक सक्षमता दाखविली. त्यानंतर नवी मुंबईमध्ये योग्य पध्दतीने नियोजनाचे काम सुरु झाले आणि पहिल्या १५ दिवसातच नवी मुंबईत नवी मुंबईमुळे कोरोनाचे रूग्णच तयार झाले नाहीत आणि अचानकरित्या ही आकडेवारी वाढू लागली. याचे कारण सुरूवातीला कोणाच्याही लक्षात आलेच नाही आणि नेमके त्याचवेळी या वाढत्या आकडेवारीने नवी मुंबईत एक भयाची वाट पसरली, पण यथाययोग्य संवादाने ती लाट संपवली गेली.
विषय एवढाच होता की, मी नव्या मुंबईत मुंबई येथे काम करणारी बरीच कुटूंबे आहेत आणि त्यातही महापालिका रूग्णालय व बेस्टचे कर्मचारी सेवेत आहेत. मुख्य म्हणजे आम्हा नागरिकांमध्येही कोरोना वॉरियर्सही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे ते त्यांची सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. पण हेच जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नवी मुंबईत आले तर १७ लाख लोकसंख्येच्या नवी मुंबईला मात्र त्याचा त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार व महापालिकेने नवी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावर येणे बंधनकारक करू नये अथवा त्यांच्या निवासाची सोय तात्पुरती मुंबईतच कोरोना कालावधीपुरती करावी. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची सावली नवी मुंबईवर पडणार नाही.
तसेच आज-काल गावबंदच्या हाकाट्या नवी मुंबईत उठत आहेत, तरी नागरिकांना आवाहन आहे की, अशा अफवांना बळी पडू नका. कारण बंद ठेवणे अथवा न ठेवणे याबाबतची सूचना सरकार जाहिर करते. गल्लीछाप नेत्यांना याचा काडीमात्रही अधिकार नाही आणि अशा अफवा पसरविणे हा गुन्हा असून त्यावर कायदेशीर कारवाई होवू शकते.
- विजय घाटे (माऊली)
- नवी मुंबई भाजपा जिल्हा महामंत्री