नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, घनकचरा विभाग कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोविड १९ चाचणी महापालिका प्रशासनाने मोफत करून घेण्याची मागणी नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाचा काळ आहे. नवी मुंबईकर घरात थांबून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नवी मुंबईकरांची सेवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य विभागातील इतर कर्मचारी, बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी, घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक, अन्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी, आशा लिंक वर्कस, सहाय्यक परिचारिका या सर्वाची पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कोविड १९ चाचणी करून घ्यावी, जेणेकरून कोरोनाग्रस्तांवर उपचार करता करता कोणाला लागण झाली आहे अथवा नाही ते स्पष्ट होईल, असे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
अत्यावश्यक सेवा बजावताना नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे अथवा नाही ते स्पष्ट होईल. आज अत्यावश्यक सेवा बजविताना हे सर्वच कर्मचारी आपलाच नाही तर आपल्या परिवाराचाही जीव नवी मुंबईकरांसाठी धोक्यात घालत असल्याने आपण समस्येचे गांभीर्य समजून घ्यावे. लवकरात लवकर पालिका प्रशासनाच्या वतीने या सर्वच कर्मचाऱ्यांची कोविड १९ चाचणी करून घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.