अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात कोरोना टेस्टींग केंद्र व लॅब सुरू करून त्याचे रिपोर्ट लवकर देण्याची इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासन शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा २५०च्या आसपास जावून पोहोचला आहे. जनसामान्यांमध्ये कोरोनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच कोरोना टेस्ट करण्यासाठी ४ हजार ५०० रूपये खासगी रूग्णालयात मोजावे लागतात. पालिका तसेच खासगी रूग्णालयात कोरोना टेस्ट केल्यास त्याचे रिपोर्ट येण्यास ६ ते ८ दिवस लागतात. काही रूग्णांचे अहवाल येण्यास त्याहून अधिक कालावधी लागलेला आहे. नवी मुंबई ही महापालिका श्रीमंत महापालिका आहे. महापालिकेचे स्वमालकीचे धरण असून अडीच हजार कोटीच्या महापालिकेच्या ठेवी आहेत. कोरोना टेस्ट झाल्यावर सहा ते आठ दिवसांनी अहवाल येत असतील आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्या संबंधिताचा कोणाकोणाशी संपर्क आला यासाठी प्रशासनाने वेळ खर्ची करायचा का? असा प्रश्न रवींद्र सावंत यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका कोरोना टेस्ट झाल्यावर ते मुंबईत जेजेला अथवा हॉफकिन या ठिकाणच्या लॅबमध्ये पाठविले जाते. त्यामुळे रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे. आज शेकडोच्या संख्येत असणारा कोरोना उद्या हजारोच्या संख्येत फैलावण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य आपण जाणून घ्या. इथेच कोरोना टेस्टींगची लॅब उपलब्ध झाल्यास अहवाल मिळण्यास विलंब होणार नाही. कोरोना टेस्टची केंद्र तर वाढलीच पाहिजे, परंतु कोरोना संदर्भातील लॅबही नवी मुंबईत तातडीने निर्माण होणे आवश्यक आहे. १७ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात एकही कोरोना टेस्टची लॅब नसणे ही बाब या शहराला भूषणावह नसून कोरोनाच्या संकटाला निमत्रंण देणारी आहे. नवी मुंबईकरांसाठी ही चिंताजनक बाब आहे. समस्येचे गांभीर्य पाहता पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करून कोरोना टेस्टींग केंद्र व लॅब सुरू करावे की जेणेकरून अहवालाही लवकर प्राप्त होईल. मागणीचे गांभीर्य पाहता नवी मुंबई महापालिका प्रशासनातील संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.