मुंबई : मुंबई परिसरात कोरोनोच्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचा-यांना पालघर, पनवेल व बदलापूर येथून ने-आण करण्याचे काम बेस्ट कर्मचारी दिवस-रात्र करित आहे. बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कोरोनोच्या परिस्थितीत विमा कवच व अन्य आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी भाजपप्रणित बेस्ट कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त व बेस्ट प्रशासनाशी चर्चा काढून मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले.
भाजपप्रणित बेस्ट कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची भेट घेतली व त्यांना आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. बेस्ट मध्ये कर्तव्यावर असताना सुमारे १५० बेस्टच्या कामगारांना कोरोनोची लागण झाली आहे. तर १२ कामगारांच्या मृत्यू झाला आहे, अश्या गंभीर परिस्थितीतही बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार व पालिका आयुक्तांशी पत्र व्यवहार करुनही ते बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित आहेत, त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्यांना मध्यस्थी करुन कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी केली आहे. यावेळी दरेकर आणि संघाचे पदाधिकारी यांच्याध्ये चर्चा झाली. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, संघाचे उपाध्यक्ष विजय माळवे, उपाध्यक्ष बाबुसिंग शिंदे, आगार अध्यक्ष विनोद रुणबाळ,बाबुलाल कहार आदी उपस्थित होते.
बेस्ट कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्यांचे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, दिव्यांग, आजारी व ५५ वयोवर्षांवरील कामगारांना या परिस्थितीत कामावर न बोलविता त्यांचे वेतन नियमित करावे अशा अनेक मागण्या बेस्ट कामगार संघाने विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे केल्या आहेत.
कोरोनाच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या बेस्ट कामगारांच्या सर्व मागण्या रास्त आहेत, त्यामुळे यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त व बेस्ट प्रशासन यांच्याशी चर्चा करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दरेकर यांनी यावेळी दिले.