
नवी मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात तुर्भे पॅटर्न राबवून हा परिसर कोरोनामुक्त करण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
कोरोनाकाळात नवी मुंबई महापालिका प्रशासन राबवित असलेले कार्य प्रशंसनीय आहे. मुंबईला कामानिमित्त जाणारे कर्मचारी व एपीएमसी बाजारपेठ पाहता प्रतिकूल परिस्थिती असतानाही केवळ महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळेच कोरोना आटोक्यात आहे. ठाणे जिल्ह्यात महापालिकेने राबविलेल्या तुर्भे पॅटनचीच सध्या चर्चा सुरू आहे. तुर्भे परिसर पूर्णत: झोपडपट्टीमय व स्लम चाळीचा तसेच डोंगराळ विभाग आणि खाणीचा परिसर आहे. कोरोनाचा उद्रेक नवी मुंबईत सर्वाधिक तुर्भे परिसरातच होईल अशी भीती असतानाच महापालिका प्रशासनाने तुर्भे परिसर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटोक्यात ठेवला आहे आणि याचे श्रेय आपल्या नेतृत्वाखाली परिश्रम करत असलेल्या महापालिका प्रशासनाला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नसल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव परिसराचा समावेश होत आहे. सुरूवातीच्या काळात या प्रभागात कोरोनाचे रूग्णही नव्हते. तथापि आता या प्रभाग ८६ मधील गाव आणि साडेबारा टक्केमध्ये तसेच सिडको सोसायट्यांमध्येही कोरोनाचे रूग्ण आढळू लागले असून हे प्रमाण वाढत आहे. हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये मोडतो, हे आपणास माहिती आहेच. त्यामुळे आपण प्रभाग ८६ मध्ये तुर्भे पॅटर्न राबविल्यास हाही परिसर कोरोनामुक्त नक्कीच होईल. सारसोळे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी कोरोनाच्या भयाखाली वावरत असून रोज कोठे ना कोठे कोरोना रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी तुर्भे पॅटर्न राबवून प्रभाग ८६ कोरोनामुक्त करण्यास मदत करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.