९६ तासात धान्य न मिळाल्यास एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा गणेश भगतांचा इशारा
- नेरूळ सेक्टर १६ए मधील ४१ फ/ २६४ या शिधावाटप दुकानातील धान्य पुरवठ्याबाबत चौकशी करण्याची मागणी
- रहीवाशांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीला वाचा फोडण्यासाठी वाशी कार्यालयात गणेश भगतांची धाव
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ए मधील ४१ फ/ २६४ या शिधावाटप दुकानातील धान्य पुरवठ्याबाबत चौकशी करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी वाशी शिधावाटप कार्यालयातील शिधावाटप अधिकाऱ्याकडे केली आहे. मात्र ९६ तासात स्थानिक रहीवाशांना धान्य न मिळाल्यास वाशी येथील शिधावाटप कार्यालयासमोरच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशाराही जनसेवक गणेश भगत यांनी दिला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून प्रभागातील रहिवाशांना नेरूळ सेक्टर १६ ए मधील ४१ फ/ २६४ शिधावाटप दुकानातील धान्य मिळण्याबाबत अडचणी येत असल्याचे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देताना पाठपुरावा करत आहोत. कोरोना काळात अनेक दिवस आमच्या विभागातील जनतेला दुकानच बंद असल्याने धान्य मिळाले नाही. त्यानंतर आजही प्रभागातील रहीवाशांना जुन महिना संपला तरी जुन महिन्याचे धान्य रहीवाशांना उपलब्ध झालेले नाही. मुख्यमंत्री एक सांगतात, अन्नधान्य पुरवठा विभागाचे संबंधित मंत्री एक सांगतात, वर्तमानपत्रात खूप काही चांगले वाचावयास मिळते, पण प्रत्यक्षात शिधावाटप दुकानात हेलपाटे मारूनही रहीवाशांना धान्य मिळालेले नाही. शिधावाटप दुकानात सतत चौकशी केल्यावर धान्य आले नसल्याचे सांगण्यात येते. जनतेत मंत्रालयीन माहितीवरून संभ्रमाचे वातावरण आहे, तर शिधावाटप दुकानावर धान्यच मिळत नसल्याने रहीवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर रहीवाशांना धान्य मिळत नसेल तर त्या दुकानाला टाळे लावणे योग्य आहे. लोकांनी हेलपाटे मारूनही धान्य मिळत नसल्यास या दुकानात धान्याचा पुरवठा किती झाला व रहीवाशांना वितरीत किती झाले याची आता चौकशी होणे आवश्यक आहे. यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी ९६ तासात ५ जुलैपर्यत विभागिय रहीवाशांना शिधावाटप दुकानांतून धान्य उपलब्ध न झाल्यास मी आपल्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यास बसेल. स्थानिक रहीवाशी आमच्याकडेही तगादा लावत आहेत की शिधावाटप दुकानात धान्य मिळत नसल्याने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. या दुकानदाराला बोलावून सत्यता जाणून घ्या. जुन महिन्याचे धान्य येत्या ९६ तासात विभागिय जनतेला उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देताना स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळवून देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांकडे केली आहे.