नवी मुंबई : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४ ते १३ जुलै दरम्यान संपूर्ण नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी एपीएमसी मार्केट सुरू ठेवले जाणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडत असताना तसेच काही व्यापाऱ्यांचे कोरोनाने निधन झालेले असतानाही बाजार समिती लॉकडाऊन काळातही सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे नवी मुंबईकरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना काळात एपीएमसी आवारातच सापडलेले कोरोना रूग्ण आणि कोरोनाच्या उद्रेकास काही अंशी बाजार समितीमधील पाचही मार्केट आवारातील अनियंत्रित गर्दी कारणीभूत असताना मार्केट बंद ठेवण्याची यापूर्वीही भाजपच्या नेतेमंडळींकडून सातत्याने मागणीही करण्यात आली होती. नवी मुंबई मधील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. प्रतिदिन दोनशेपेक्षा जास्त रूग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीमध्ये रूग्णांचा आकडा ६८२३ वर पोहचला आहे. आतापर्यंत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने १२ ठिकाणी विशेष लॉकडाऊन सुरू केला आहे. परंतु या व्यतिरिक्त ही शहरातील इतर ठिकाणी ही रूग्ण वाढत आहेत. यामुळे शुक्रवारी मध्यरात्री पासून दहा दिवस संपूर्ण नवी मुंबई मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
४ ते १३ जुलै दरम्यान संपूर्ण नवी मुंबई मध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या कालावधीत कोरोना ची साखळी खंडीत करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम व औषध फवारणी केली जाणार आहे. या दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवली जाणार आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत ही सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.