
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता नवी मुंबई महापालिकेने स्वत:च्या खर्चातून शहरात कोरोना टेस्ट लॅब उभारावी अशी मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची कोरोनाबाबत चाचणी केली तरी त्याचे चाचणी अहवाल येण्यास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर चांगले, परंतु पॉझिटिव्ह अहवाल आला तर तात्काळ हालचाली करून उपचारासाठी यंत्रणा सतर्क होते. पंरतु यादरम्यान संबंधित पॉझिटिव्ह रूग्ण शेकडो लोकांच्या संपर्कात आलेला असतो. नवी मुंबईसारख्या सधन महापालिकेत कोरोना टेस्ट लॅब स्वखर्चाने उभी करणे अशक्य नाही. कोरोना रूग्णांची वाढती आकडेवारी नवी मुंबईसारख्या प्रगत शहराला भूषणावह बाब नाही. करदात्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. करदात्या नागरिकांकडून कर गोळा करून अडीच हजार कोटीच्या ठेवी वाढविण्यात धन्यता मानणे चुकीचे आहे. आता नवी मुंबईकरांचे प्राण वाचविणे महत्वाचे आहे. नवी मुंबईकर कोरोनाच्या संकटातून सुटला तर आपणास अडीच हजार नाही तर पाच हजार कोटीच्या ठेवी वाढविता येतील; लवकरात लवकर महापालिकेने नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना टेस्ट लॅब लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.