
नवी मुंबई : फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या दिवशीही ऑनलाईन शिकविण्यास नकार देणाऱ्या सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेवर तातडीने कारवाई करून शाळेचे संचालक व प्राचार्याना तुरूंगात टाकण्याची मागणी सानपाड्याचे भाजप नेते पांडूरंग आमले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
सध्या कोरोना काळ सुरू आहे. नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला असून पुन्हा लॉकडाऊन जाहिर करावा लागला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. अनेकांना दळणवळणाची सुविधा नसल्याने कामावर जाणे शक्य होत नाही. अनेकांना कामावर आले नाही म्हणून तीन महिन्याचे वेतन मिळालेले नाही. अशा परिस्थितीत नवी मुंबईकर संघर्ष करत आला दिवस ढकलत आहे. त्यातच सानपाडा परिसरात असणाऱ्या रायन इंटरनॅशनल स्कूल या शाळेने कोरोना काळाचे गांभीर्य जाणून घेता अमानुष कौर्याचा कळसच गाठला आहे. विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून त्यांना बुधवार, दि.१ जूनपासून ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकविण्याचे बंद केले आहे. काल या शाळेच्या प्राचार्याना भेटून परिस्थिती सुरळीत झाल्यावर फी भरू असे पालकांनी सांगितल्यावरही शाळा ऐकण्यास तयार नाही. सानपाडा परिसरात ही या सर्वात महागडी शाळा म्हणून परिचित आहे. इतर शाळांच्या तुलनेत या शाळेचे डोनेशन व फीही सर्वाधिक आहे. केवळ आपल्या मुलांना शाळेसाठी लांबवर ये-जा करावी लागू नये म्हणून परिसरातील मध्यमवर्गीय पालक पोटाला चिमटा घेवून मुलांना शाळेत पाठवित असतात. आजवर केवळ फी व डोनेशनच्या माध्यमातून मलिदा लाटलेल्या रायन इंटरनॅशनल शाळेने कोरोना काळात फीसाठी मुलांना ऑनलाईन वर्गात बसू न देणे ही संतापजनक बाब आहे. पालक आम्हाला मुदत द्या, आम्ही फी भरतो असा टाहो फोडूनही शाळेला पाझर फुटत नाही. बुधवार दि. १ जुलै व आज गुरूवार, दि. २ जुलै रोजी मुलांना फी भरली नाही म्हणून ऑनलाईन वर्गातून शिक्षण दिले नाही. या शाळेच्या प्रवेशद्वारावर गेल्यावर तीन-चार तास प्रवेशद्वारावरच उभे केले जाते. प्राचार्या काही ऐकून घेत नाही. फी भरली तरच मुलांना शिकवू अशी ताठर भूमिका घेत सर्वाना उर्मटपणाची वागणूक देत आहे. आपल्या पालकांकडे पैसा नाही म्हणून आपले शिक्षण थांबले असा मुलांमध्ये समज होवून पालकांबाबत त्यांच्या मतात अढी निर्माण होवून भविष्यात मुलांच्या मनात पालकांबाबत संताप निर्माण होवून कौंटूबिक वातावरणातही कलह निर्माण होण्याची भीती असल्याचे पांडूरंग आमले यांनी म्हटले आहे.
फी भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या नवी मुंबईमधील रायन इंटरनॅशनल शाळेवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रायन इंटरनॅशनल शाळा केवळ फीचे निमित्त पुढे करून मुलांना शिक्षण देण्यास नकार देत असेल तर त्या शाळेची मान्यता रद्द करून शाळेची जागाही सरकारने ताब्यात घ्यावी. फी न भरल्यामुळे कोरोना काळात मुलांचे जाणिवपूर्वक शैक्षणिक नुकसान करणाऱ्या रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापणावर, प्राचार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकावे की जेणेकरून केवळ फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे धाडस कोरोना काळात कोणतीही शाळा करणार नाही. शक्य तितक्या लवकर नवी मुंबईतील सानपाडा विभागातील रायन इंटरनॅशनल शाळेवर आपण कठोरात कठोर कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी मुख्यमंत्री व नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.