
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे फी भरणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना सानपाड्यातील रायन इंटरनॅशनल शाळेने ऑनलाईन वर्गामधून शिकविणे बंद केले. फी भरा तरच ऑनलाईन शिकविले जाईल अशी भूमिका घेत रायन इंटरनॅशनलने मुलांना ऑनलाईन शिकविणे बंद केल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. या पालकांसमवेत भाजपचे सानपाडामधील नेते पांडूरंग आमले यांनी शाळेत धाव घेत प्राचार्याना या कृत्याचा जाब विचारत फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिकविणे बंद करणे चुकीचे असल्याचा सांगत आमले यांनीआपला संताप व्यक्त केला.
कोरोनाच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक कंपन्या व कारखाने बंद आहेत. पालकवर्गाला वेतनही झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आज सकाळी रायन इंटरनॅशनल शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना अचानक ऑनलाईन शिकविणे बंद केले. या प्रकाराने विद्यार्थी व पालकवर्गात खळबळ उडाली. त्यांनी भाजपाचे सानपाड्यातील स्थानिक नेते पांडूरंग आमले यांची भेट घेत शाळेच्या मनमानीपणाचा पाढा वाचला.
भाजप नेते पांडूरंग आमले यांनी पालकांसमवेत शाळेत धडक दिली असता, शाळेने त्यांना व पालकांना बराच वेळ शाळेतच घेतले नाही. प्राचार्य भेटणार नसल्याचे आमले व पालकांना शाळेतून सांगण्यात आले. त्यावेळी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत आमलेंनी व उपस्थित पालकांनी आपण घरी जाणार नसल्याचे ठासून सांगितले. अखेर दोन-अडीच तासानंतर आमले व पालकांना शाळेत प्राचार्यांना भेटण्यासाठी घेण्यात आले.
यावेळी प्राचार्या फर्नाडीस यांनी सुरूवातीलाच आमले यांना तुमच्या पालकांची यादी द्या. आपण त्यांचा विचार करू असे सांगितल्यावर आमले यांनी मी कोणा चार-पाच जणांसाठी आलेलो नसून सर्वच पालकांना न्याय देण्यासाठी शाळेत आलो असल्याचे सांगितले. निवेदन द्या व मग सांगू असे प्राचार्यानी सांगताच लॉकडाऊनमुळे सर्वाचीच आर्थिक कोंडी झाल्याचे सांगत वातावरण निवळताच पालक फी भरतील असे सांगताच प्राचार्यांनी पालकांनी फी न भरल्यास कोण भरणार अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली. त्यावर आमले यांनी सानपाडा विभागात सर्वाधिक डोनेशन व फी तुमच्याच शाळेकडून घेतली जाते. आजवर इतक्या वर्षात पालकांनी फी बुडविली नाही, आता का बुडवतील, फीचा प्रश्न आहे म्हणून मुलांना ऑनलाईन शिकविण्यापासून शाळेला बंद ठेवता येणार नाही. इतकी वर्षे डोनेशन व फी भरमसाठ घेतली, त्यावेळी पालकांचा तुम्ही विचार केला का, असा प्रश्न आमले यांनी प्राचार्याना केला. त्यावर तुम्ही लेखी निवेदन द्या, पालकांची जबाबदारी घेवू अशी ताठर भूमिका प्राचार्यानी घेतली. आमले यांनी आपण तसे निवेदन देवू, पण मुलांना ऑनलाईन शिकविण्यापासून वंचित ठेवू नका , असे ठणकावून सांगितले.
केवळ फी भरली नाही म्हणून मुलांना ऑनलाईन वर्गात बसू न देणे हा अमानुष कौर्याचा कळस असून याप्रकरणी आपण मंत्रालयीन पातळीवर तसेच वेळ पडल्यास न्यायालयीन पातळीवर संघर्ष करू. सध्या कोरोनाचा काळ आहे. पालकांना उत्पन्न नाही. वातावरण निवळताच पालकांनी फी भरण्याची तयारी दर्शविली आहे. या शाळेच्या व्यवस्थापणाला कोरोना समस्येशी व पालकांच्या परिस्थितीशी काहीही देणेघेणे नसेल व यापुढेही शाळा मुलांना फी भरली नाही म्हणून शिकवित नसेल तर सानपाडामधील जनता शाळेविरोधात संघर्ष केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा सानपाड्यातील भाजपा नेते पाडूंरंग आमले यांनी दिला आहे.