नवी मुंबई : कोपरखैराणे प्रभाग ४२ मधील नगरसेवक देविदास हांडेपाटील यांच्या निधनानंतर जनसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम त्यांच्या पत्नी सुनिता देविदास हांडेपाटील व त्यांचा मुलगा सुनिकेत देविदास हांडेपाटील यांनी सक्षमपणे सुरू केले आहे. कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकी परिसरातील स्वच्छतेविषयी समाजसेविका व भाजपा कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी आयुक्तांना समस्येच्या छायाचित्रासह लेखी तक्रार करताना समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तांनी संबंधितांना तात्काळ कार्यवाही कऱण्याचे निर्देश दिल्यामुळे शनिवारी पाण्याची टाकी परिसर स्वच्चतेला सुरूवात झाली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २३ परिसरात सिडकोच्या आकाशगंगा सोसायटीच्या मागील बाजूस पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या आवारात महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता राखली न गेल्याने त्या परिसराला बकालपणा निर्माण झाला आहे. या टाकीच्या आवारात जंगली गवत वाढले असून झाडांच्या फांद्याही पडलेल्या आहेत. झाडाचा पालापाचोळाही पडलेला आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने तसेच झाडांचा कुजलेला पालापाचोळा व अन्य कारणामुळे स्थानिक रहीवाशांना सांयकाळनंतर दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे. यामुळे डासांच्या घनता वाढीला पोषक वातावरण निर्माण होवून स्थानिक रहीवाशांना सतत डासांचा त्रास सहन करावा लागत असून सतत दारे-खिडक्या डासांच्या त्रासामुळे बंद ठेवाव्या लागत आहे. त्यातच जंगली झाडांच्या पडलेल्या फांद्या, वाढलेले जंगली गवत, कचरा यामुळे तेथे साप-नाग-घोणस आदींचाही वावर वाढला आहे. या पाण्याच्या टाकीलगतच असलेल्या सिडकोच्या आकाशगंगा सोसायटीमध्ये काही दिवसापूर्वीच घोणस आढळून आली होती. स्थानिकांनी ती पकडून सर्पमित्राच्या स्वाधीन केली. अजूनही आकाशगंगामधील रहीवाशांना साप-नागाचे दर्शन अधूनमधून होत असते. त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य रहीवाशांच्या जिविताला सर्पदंशामुळे जिवितहानीची टांगती तलवार कायम आहे. डासांचा उद्रेक टाळण्यासाठी, परिसराला आलेला बकालपणा घालविण्यासाठी तसेच नाग-सापांपासून संभाव्य जिवितहानी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर या पाण्याच्या टाकी परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचरा हटवण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. सोबत या समस्येची छायाचित्रेही सुनिता हांडेपाटील यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनासोबतही जोडली होती. पालिका आयुक्त बांगर यांनी तात्काळ या समस्येची दखल घेतानाच संबंधितांना पाण्याच्या टाकी परिसराच्या स्वच्छतेचे निर्देशही दिले.
शनिवारी सकाळी पाण्याची टाकी परिसरात पालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियानास सुरूवात झाली असून येत्या तीन चार दिवसात पाण्याच्या टाकी परिसराची पूर्णपणे सफाई होवून बकालपणा गेलेला असेल असे पालिका कर्मचाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले. अवघ्या २४ तासात पालिका प्रशासनाकडून दखल घेवून समस्या निवारणास सुरूवात झाल्याने स्थानिक रहीवाशांकडून सुनिता देविदास हांडेपाटील यांचे आभार मानण्यात येत आहे.