नवी मुंबई : सिडकोच्या आकाशगंगा सोसायटीमागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीच्या आवारात युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी भाजप कार्यकर्त्या व समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २३ परिसरात सिडकोच्या आकाशगंगा सोसायटीच्या मागील बाजूस पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या आवारात महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता राखली न गेल्याने त्या परिसराला बकालपणा निर्माण झाला आहे. आपण स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. या टाकीच्या आवारात जंगली गवत वाढले असून झाडांच्या फांद्याही पडलेल्या आहेत. झाडाचा पालापाचोळाही पडलेला आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने तसेच झाडांचा कुजलेला पालापाचोळा व अन्य कारणामुळे स्थानिक रहीवाशांना सांयकाळनंतर दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे. यामुळे डासांच्या घनता वाढीला पोषक वातावरण निर्माण होवून स्थानिक रहीवाशांना सतत डासांचा त्रास सहन करावा लागत असून सतत दारे-खिडक्या डासांच्या त्रासामुळे बंद ठेवाव्या लागत आहे. त्यातच जंगली झाडांच्या पडलेल्या फांद्या, वाढलेले जंगली गवत, कचरा यामुळे तेथे साप-नाग-घोणस आदींचाही वावर वाढला आहे. या पाण्याच्या टाकीलगतच असलेल्या सिडकोच्या आकाशगंगा सोसायटीमध्ये काही दिवसापूर्वीच घोणस आढळून आली होती. स्थानिकांनी ती पकडून सर्पमित्राच्या स्वाधीन केली. अजूनही आकाशगंगामधील रहीवाशांना साप-नागाचे दर्शन अधूनमधून होत असते. त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य रहीवाशांच्या जिविताला सर्पदंशामुळे जिवितहानीची टांगती तलवार कायम आहे. डासांचा उद्रेक टाळण्यासाठी, परिसराला आलेला बकालपणा घालविण्यासाठी तसेच नाग-सापांपासून संभाव्य जिवितहानी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर या पाण्याच्या टाकी परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचरा हटवण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी केली आहे.