
नवी मुंबई : केंद्र सरकारने बहूमताच्या जोरावर कामगार व शेतकऱ्यांबाबत नुकतेच काही कायदे संमत करून घेतले आहेत. हे कायदे कामगार व शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारे असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडून राज्यात सर्वत्र गुरूवारी ‘शेतकरी बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. नेरूळमध्ये कॉंग्रेसच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या रॅलीचे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत स्थानिक रहीवाशी, विशेषत: महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याने नवी मुंबईत नेरूळ कॉंग्रेसचच्याच ‘शेतकरी बचाव रॅली’ची चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत कमालीचे आक्रमक झाले असून उत्तर प्रदेश हाथरस प्रकरणी राहूल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. काही दिवसापूर्वीच जुईनगरमधील चिंचोली तलावात उतरून आंदोलन करण्यात आले होते.
‘शेतकरी बचाव रॅली’दरम्यान नेरूळ येथील कॉंग्र्रेसच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात टिव्हीच्या माध्यमातून उपस्थित रहीवाशांना, कार्यकर्त्याना, पदाधिकाऱ्यांना कामगार च शेतकरी कायद्याविषयी ‘र्व्हच्युअल’ मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक रहीवाशी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामगार व शेतकरीविरोधात केलेल्या कायद्याविरोधात आपला संताप व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्याविरोधात काही काळ ‘भाजप हटाव आणि कामगार, देश बचाव’ जोरदार घोषणाबाजीही केली.
‘शेतकरी बचाव रॅली’मध्ये नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्यासह नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, सुधीर पांचाळ, तुकाराम महाराज, दिनेश गवळी, गौरव महापुरे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व रहीवाशी सहभागी झाले होते.