
नवी मुंबई : महापालिका नेरूळ नोड येथील प्रभाग ९६ मध्ये स्वच्छता ठेवण्याचे व सफाई करून बकालपणाला मदत करणाऱ्या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी सफाई ठेकेदाराला शुक्रवारी पाहणी अभियानादरम्यान दिले.
प्रभागातील भाजपा नेते गणेश भगत यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून स्वच्छता व अन् समस्यांची पाहणी करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.प्रभाग ९६ मध्ये पदपथावर असलेला कचरा, ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज, रॅबिट, पदपथावर साचलेले शेवाळ व अन्य स्वच्छताविषयक समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेला बकालपणा याची पाहणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रभागात पाहणी अभियान राबवावे अशी मागणी गणेश भगत यांनी पालिका प्रशासनाकडे करताना सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या मागणीनुसार पालिका प्रशासनाकडून शुक्रवारी प्रभाग ९६ मध्ये पाहणी अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये पालिका प्रशासनाकडून स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, जयश्री आढळ, अजित तांडेल, रोहन पाटील यांच्यासह साफसफाईचे ठेकेदार शत्रुघ्न मेहेर सहभागी झाले होते. स्थानिक भाजपा नेते गणेश भगत यांनी प्रभागातील नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ मध्ये सर्व फिरून तेथील कचरा, डेब्रिज, रॅबिट व अन्य कारणामुळे निर्माण झालेला बकालपणा पालिका प्रशासनातील संबंधितांच्या निदर्शनास आणून दिला. या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे पालिका अधिकाऱ्यांनी साफसफाई ठेकेदाराला निर्देश दिले.