
नवी मुंबई : ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नवी मुंबई शिवसेनेनेही पाठपुरावा करून संबंधित कामगारांच्या कायम सेवेसाठी सहकार्य करावे यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी रविवारी (दि. ८ ऑक्टोबर) शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून साद घातली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची वाशीतील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रवींद्र सावंत यांनी महापालिकेतील ठोक मानधनावरील कामगारांसमवेत भेट घेवून त्यांना याप्रकरणी सहकार्य करण्याची गळ घातली. नवी मुंबई इंटकच्या वतीने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सहकार्य करण्याबाबत साकडे घातले. कामगारांनीही या बैठकीत आपली कैफीयत शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासमोर सादर केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी कामगार नेते रवींद्र सावंत व कामगारांचीही नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणण्याचे व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी शिवसेना इंटकच्या प्रयत्नाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.