
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला सुरक्षा प्रदान करणाऱ्या होल्डींग पाँड या अत्यंत महत्वाच्या नागरी सुविधेतील अडचणींकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देत शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्या समवेत सेक्टर १२, सीबीडी बेलापूर तसेच सेक्टर ८, वाशी या होल्डींग पाँडचा पाहणी दौरा केला.
होल्डींग पाँडमध्ये साचलेला गाळ व त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची होल्डींग पाँडची कमी झालेली क्षमता या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या विषयाची पाहणी करीत यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना भरतीची वेळ असेल तर शहराच्या काही भागात पाणी साचण्याचे प्रसंग उद्भवतात या अनुषंगाने आयुक्तांनी होल्डींग पाँडची व अनुषांगिक यंत्रणेची बारकाईने पाहणी केली.
या पाहणी दरम्यान गाळ काढून होल्डींग पाँडची क्षमता वाढविणे तसेच होल्डींग पाँडमध्ये वाढलेले कांदळवन याबाबत मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथेरिटी आणि वन विभागाचा मॅनग्रुव्हज सेल यांच्या परवानगीसाठी तत्परतेने प्रस्ताव बनवून सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
भरतीच्या कालावधीत पाऊस पडत असेल तेव्हा होल्डींग पाँडमधील अतिरिक्त पाणी पम्पींग केले जाते. या पंप हाऊसच्या सीबीडी बेलापूर व वाशी येथे असलेल्या इमारती तीस वर्षाहून अधिक जुन्या झालेल्या असल्याने त्याठिकाणी नवीन पंप हाऊस उभारण्याचे निविदा प्रक्रियेत असलेले काम करताना ते दूरगामी विचार करून अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून करावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच नवीन पंप हाऊस उभारताना सद्यस्थितीत वापरात असलेले पम्प हाऊस तसेच वापरात ठेवून नवीन पम्प हाऊस बांधण्याचे काम करण्यात यावे असे निक्षून सांगितले. जेणेकरून पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे नवीन पम्प हाऊस उभारताना आय.आय.टी. च्या तज्ज्ञांचे उभारण्यापूर्वीच मार्गदर्शन घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
महत्वाचे म्हणजे पंप हाऊस बांधताना त्याची उंची ही भरतीच्या वेळेची पाण्याची उंची लक्षात घेऊन ठेवावी,, जेणेकरून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही व पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होईल अशा मौलिक सूचना आयुक्तांनी केल्या.पाऊस पडताना भरती असेल आणि अशा मोक्याच्या वेळी वीजपुरवठा खंडीत झाला तर अतिरिक्त पाणी पम्पींग करताना अडथळे येऊ नयेत याकरिता एक्सप्रेस फीडरचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे होल्डींग पाँडच्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याबाबतही आयुक्तांनी सूचना केल्या. नवी मुंबई शहराच्या दृष्टीने होल्डींग पाँड ही शहराचे सुरक्षा कवचे असून आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत त्यांच्या सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.