
नवी मुंबई ः महाराष्ट्र सरकारच्या मराठा समाजाशी संबंधित असलेल्या ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ची पुनर्रचना करून या ‘महामंडळ’च्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र तथा माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांची पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’चे पदाधिकारी, तमाम माथाडी कामगार आणि मराठा समाजाकडून करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार 1995 ते 99 या कालावधीत राज्यात सत्तेवर असणाऱ्या ‘शिवसेना भाजपा युती सरकार’मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ची स्थापना करण्यात आली. यानंतर राज्यात सेना भाजप पक्षाचे सरकार असताना ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ला पुनर्जिवीत करुन या ‘महामंडळ’च्या अध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यानंतर ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’चे अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दौरे करुन मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी परिश्रम घेतले. कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना शासनाच्या माथाडी ॲक्ट, 1969 आणि त्यान्वये स्थापन झालेल्या माथाडी बोर्डाच्या योजनेचे संरक्षण मिळवून देण्यासाठी माथाडी संघटनेचे सरचिटणीस पदाची धुरा सांभाळून नरेंद्र पाटील यांनी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’च्या योजनेचा लाभ युवकांंना मिळण्यासाठी कार्य केले आहे.
दरम्यान, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अशासकीय सदस्य आणि विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबतचा शासनाच्या कैौशल्य विकास, रोजगार-उद्योजकता विभागाने निर्णय घेतलेला आहे. वास्तविक पाहता यापूर्वी शासनाने इतर महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या. परंतु, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ वरील नियुक्त्या शासनाने कायम ठेवल्या होत्या. त्यातच या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले असताना शासनाने ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’च्या नियुक्त्या रद्द केल्यामुळे तमाम माथाडी कामगार आणि मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ची पुनर्रचना करुन अध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची पुनर्नियुक्ती व्हावी, अशी मागणी ‘माथाडी कामगार युनियन’चे पदाधिकारी, तमाम माथाडी कामगार आणि मराठा समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.