
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना साथीच्या आजाराबाबत दुसरी लाट सांगत जगातील काही देशामध्ये ‘टेन्शन’ वाढीस लागले असले तरी नवी मुंबई शहर मात्र कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होवू लागले आहे. बाजार समिती, एमआयडीसीचे अस्तित्व तसेच जेएनपीटी, ठाणे, मुंबई व रायगडकडे याच भागातून होत असलेली दररोजची वर्दळ पाहता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना व या शहराला कोरोनामुक्त करण्यास मोठ्या प्रमाणावर यश मिळविले आहे. शनिवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण अवघे ९१ सापडल्याने नवी मुंबईकरांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या परिश्रमाला व कोरोनावर मात करण्यासाठी राबविलेल्या नियोजनाला शाबासकी उघडपणे देण्यास सुरूवात केली आहे.
नवी मुंबईमध्ये शनिवारी कोरोनाचे ९१ रूग्ण सापडले असून त्यामध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण नेरूळ विभागात सापडले आहेत. कोरोना रूग्णांचा नेरूळ विभागातील आकडा २३ असून त्याखालोखाल ऐरोली विभागात कोरोनाचे २० रूग्ण सापडले आहेत. वाशी १३, बेलापुर १०, कोपरखैराणे १०, तुर्भे ९, घणसोली ४ तर दिघा विभागात २ कोरोना रूग्ण सापडले आहेत.
वयाची चाळीशीही न गाठलेल्या युवा उमद्या पालिका आयुक्तांनी अर्थात अभिजित बांगरांनी नवी मुंबई शहराला कोरोनामुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना व सरासरी दररोज पाचशे कोरोना रूग्ण शहरात आढळून येवू लागल्यावर पालिका प्रशासनाला त्यांचे काम करून देण्याऐवजी पालिका मुख्यालयात भेटीगाठी घेण्याचा व कोरोना महामारीवर पालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेण्याचा सपाटा विविध राजकीय घटकांनी लावला, त्यात माजी नगरसेवकांचाही भरणा मोठ्या प्रमाणावर होता. चमकेश लोकांनी भेटीची छायाचित्र सोशल मिडियावर प्रकाशित करत पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील लोकांची मने संपादन करण्याचा प्रयत्न केला.
जगामध्ये पुन्हा कोरोनाचे दुसरे पर्व उपद्रव दाखविण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच नवी मुंबई शहर मात्र कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहोचले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी उघडण्यात आलेली कोव्हिड केअर सेंटर आता कोरोना रूग्णांअभावी पालिका प्रशासनाला बंद करण्याची वेळ आलेली आहे. कोरोनामुक्तीबाबत तसेच कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी राजकीय घटकांकडून कितीही श्रेय घेण्याची आदळआपट सुरू असली तरी खरे श्रेय हे महापालिका आयुक्त अभिजित बांगर व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महापालिका प्रशासनाचेच असल्याची चर्चा नवी मुंबईकरांमध्ये उघडपणे होवू लागली आहे.