
स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या कायम सेवेसाठी आपण महापालिका ते मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करत असून या शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे.
महापालिका प्रशासनात गेल्या काही वर्षापासून ठोक मानधनावर शिक्षक काम करत आहेत. ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी कामगार नेते रवींद्र सावंत महापालिका मुख्यालय ते मंत्रालयीन पातळीवर गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. अधिवेशनादरम्यानही त्यांनी अन्य आमदारांच्या माध्यमातून या प्रश्नांवर प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणताना ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम झाल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावरील कायम सेवेचा प्रस्ताव मंत्रालयीन मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. तथापी या प्रस्तावामध्ये ठोक मानधनावरील काम करणाऱ्या शिक्षकांचाही समावेश करून सुधारीत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला साकडे घालत लेखी पाठपुरावा व व्यक्तिगत भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.
ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळावी म्हणून कामगार नेते रवींद्र सावंत यांनी बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटिवार या कॉंग्रेसच्या मातब्बरांसह विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या भेटीगाठी घेवून राज्य सरकारकडून लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेवून त्यांनाही सहकार्य करण्याचे साकडे घातले आहे. नवी मुंबई पातळीवर शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून याप्रकरणी सहकार्य करण्याची त्यांना गळ घातली आहे. ठोक मानधनावर काम करणाऱ्या पालिका शाळेतील शिक्षकांनी काल कामगार नेते रवींद्र सावंत यांची त्यांच्या नेरूळ येथील कार्यालयात भेट घेवून आपल्या समस्या त्यांच्या कानावर घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. यावर कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.