
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८७च्या शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रामध्ये महापालिका प्रशासनाने भरणा केंद्र सुरु केले आहे. यामुळे सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांना पाणीपट्टी, मालमत्ता कर भरणे आता पुन्हा एकवार परिसरातच उपलब्ध झाले आहे.
पूर्वी मालमत्ता कर व पाणी पट्टी भरण्यासाठी नेरूळ पश्चिम परिसरातील रहीवाशांना नेरूळ पूर्वेकडील महापालिका विभाग कार्यालयात जावे लागत असे. यासाठी रहीवाशांना अर्ध्या तासाची पायपीट अथवा रिक्षासाठी ५० ते ७० रूपयाची पदरमोड करावी लागत असे. नेरूळ पश्चिमेकडील रहीवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेरूळ सेक्टर ८ व १० चे तत्कालीन शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे पश्चिमेला भरणा केंद्र सुरू करावे यासाठी पाठपुरावा सुरू केला. मांडवेंच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर ८ मध्ये मांडवेंच्याच प्रभागात महापालिकेच्या कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रामध्ये भरणा केंद्र सुरु केले. नेरूळ पश्चिमेकडील रहीवाशांची पायपीट व रिक्षासाठी करावा लागणारा खर्च संपुष्ठात आला. पुढे महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय नेरूळ सेक्टर ४ परिसरात स्थंलातरीत झाले तरी महापालिकेच्या कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रामध्ये भरणा केंद्र पालिका प्रशासनाने सुरूच ठेवले.
कोरोना सुरू झाल्यावर महापालिका प्रशासनाने ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका बंद केल्यामुळे महापालिकेने भरणा केंद्रही बंद केले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नागरिकांची भरणा करण्याबाबत होत असलेली गैरसोय पाहता पालिका प्रशासनाने पुन्हा या ठिकाणी भरणा केंद्र सुरू करावे म्हणून शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दोनच महिन्यात तीन वेळा लेखी निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने पुन्हा कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रामध्ये महापालिका प्रशासनाने भरणा केंद्र सुरु केले.