
मुंबई : निलेश मोरे
सणासुदीच्या काळात तेल, तूप यात होणारी भेसळ लक्षात घेऊन गेल्या महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातून ५० लाखांच्या आसपास भेसळयुक्त तेल , तूप जप्त केले आहे. अशाच प्रकारे काल रात्री घाटकोपर पश्चिम येथील गावदेवी परिसरात असलेल्या अंबिका ऑइल डेपो वर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली होती. या ठिकाणी ब्रॅण्डेन तेलाच्या नावाने भेसळयुक्त तेल विकले जात असल्याची माहिती एफडीए ला मिळताच घाटकोपर गावदेवी येथील अंबिका ऑईल डेपोवर अधिकाऱ्यांनी छापा टाकत तेल जप्त केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी छापा टाकत १४१८.६ किलोचे अंदाजे १ लाख ८२ हजार ९६९ रुपये किमतीचे सात प्रकारचे तेल सील केले आहे.
एफडीएचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकले, सह आयुक्त शशिकांत केंकरे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. सावंत, आर. बी. पवार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत राईचे , नारळाचे, शेंगदाणा तेल सह डालडा ही सील केला आहे. यातील सँपल अन्न व औषध प्रशासनाच्या लॅब ला पाठविण्यात आले असून त्याचे रिपोर्ट येताच पुढील कारवाई एफडीए करणार आहे. मात्र दिवाळीच्या काळात अशा प्रकारे एफडीएने केलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.