
मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी वाहून घेतले होते. शेवटपर्यंत ते काँग्रेस विचारासाठी जगले. त्यांच्या निधनाने पक्षाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
मोतीलाल व्होरा यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली होती. १९६८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७० मध्ये त्यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवून विजय संपादन केला तर १९७७ आणि १९८० मध्ये पुन्हा विजय संपादन केला. त्यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीयमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपालपद भूषवले. १८ वर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली. ते राज्यसभेचे सदस्यही होते. पक्ष संघटनेतील विविध पदांची जबाबदारीही त्यांनी य़शस्वीपणे पार पाडली. कालच त्यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्होरा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.