
संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावरील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या कायम सेवेबाबतचा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी सहकार्य करण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले. यावेळी रवींद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संतोष शेट्टी व ठोक मानधनावर काम करणारे शिक्षकही उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका प्रशासनातील शिक्षण विभागात ठोक मानधनावर प्राथमिक शाळांमध्ये १३८ शिक्षक तर माध्यमिक शाळांमध्ये १३६ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकने सातत्याने महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महापालिका आयुक्तांच्या सतत भेटी घेवून, लेखी निवेदने सादर करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेसाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडलेली आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित शिक्षकांच्या कायम सेवेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव (माध्यमिक शिक्षकांसाठीचे पत्र : जा.क्रं. नमुंमपा/शि.वि/२२०५/२०२० तर प्राथमिक शिक्षकांसाठीचे पत्र : जा.क्रं. नमुंमपा/शि.वि/२२०६/२०२० )पाठविलेला आहे. आपण यासंदर्भात इंटकचे प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, महापालिका शिक्षण विभाग, राज्य सरकार शिक्षण विभाग यांची आपल्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून या प्रकरणाला गती मिळवून द्यावी. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संबंधित शिक्षक आपणाबाबत आशावादी आहेत. या प्रस्तावास राज्य सरकारची लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करून नवी मुंबई इंटकला सहकार्य करावे अशी विनंती यावेळी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना केली.
रवींद्र सावंत यांना सकारात्मक प्रतिसाद देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आगामी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या दालनात इंटक संघटना व पालिका आयुक्त ,व शिक्षण अधिकारी पालिकेचे यांची संयुक्त बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.