केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवलेंनी केला संत परंपरेचा गौरव
मुंबई : डॉ. आंबेडकरांनी संविधानातून मांडलेला समतेचा विचार संतानी महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. समाजातली जातीयता नष्ट करण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी संत परंपरेची थोरवी सांगितलीय. वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले. त्याच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रविण दरेकर यांनीही या सांगता सोहळ्यात हजेरी लावत आपले विचार मांडले. आपल्या भाषणात मा. दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘पहिले मंदिर फिर सरकार’ असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदलली आहे, म्हणूनच संजय राऊत राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवायले हवे अशी भाषा करीत आहेत. तसेच राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येत आहे, खंडणी नव्हे असे ठणकावून सांगतानाच दरेकर म्हणाले की, आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून अगोदर बाहेर या, असा मार्मिक टोलाही दरेकर यांनी राऊत यांना लगावला आहे.
वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या जुहू परिसरातल्या हॉटेल नोव्हेटेल इथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनादरम्यान अनेक विषयांवर चर्चा आणि परिसंवाद पार पडले. तर वारकरी समुदायाशी संबंधित सात महत्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले. यामध्ये पैठण किंवा पंढरपुरात संतपीठाची निर्मिती करणे, सर्व फडकरी बांधवांना मासिक मानधनासाठी पाठपुरावा करणे, इंद्रायणी, भिमा आणि निरा नदी पात्र प्रदूषण विरहित करणे तसंच आळंदी येथील वारकरी, फडकरी यांच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करणे यासारख्या महत्वाच्या ठरावांचा समावेश आहे.