नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक यांचे कार्यकर्त्याना आवाहन
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : महापुरामुळे राज्यात उदभवलेली संकटस्थिती आणि कोरोना
संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन ऐरोलीचे प्रथम आमदार
व नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या संदीप नाईक यांनी
कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.
येत्या ४ ऑगस्ट रोजी संदीप नाईक यांचा वाढदिवस असून दरवर्षी
कार्यकर्ते मोठया उत्साहाने तो साजरा करीत असतात. मोठया संख्येने संदीप नाईक यांची
प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना शुभेच्छा देतात. मात्र मागील दिड वर्षांपासून राज्यात
कोविड महामारीचा झालेला उद्रेक आजही कायम आहे. त्यातच यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यात
सर्वत्र हाहाःकार उडाला आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित
आणि वित्तहानी झाली आहे. अशा दुःखद वातावरणात कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझा वाढदिवस
साजरा करू नये. माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी पुरग्रस्तांना तसेच कोरोना पिडीतांना
सढळ हस्ते मदत करावी, असे संदीप नाईक यांनी म्हंटले आहे. जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा
नेहमीच माझ्यासोबत आहेत, असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे. सर्वांनी कोरोना
प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपल्या नवी मुंबईला आणि राज्यालाही कोरोनामुक्त करण्यात
आपले योगदान द्यावे त्याचप्रमाणे पुरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करावी, असे आवाहनसुध्दा
संदीप नाईक यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून
कोरोना महामारी नाहीशी होईल, असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे.