संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : मागील आठवड्यात कोकणासह इतर भागाला बसलेल्या जलवृष्टीच्या तडाख्यातून तेथील जनजीवनाला मदतीचा हात देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे त्वरित २४ जुलैपासूनच महानगरपालिकेची मदतकार्य पथके महाड, चिपळूण, कोल्हापूर भागात अथक मदतकार्य करीत आहेत. समर्पित भावनेने केल्या जात असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्याची दखल तेथील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरणे तसेच प्रसारमाध्यमांकडूनही घेतली जात आहे. तेथील सोशल मिडीयावरूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकांच्या कामांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण झाले आहे.
कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापूराच्या आपत्कालीन स्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने तत्परतेने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा ताराराणी सभागृहात विशेष सत्कार केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छतेचे काम उत्कृष्टपणे पार पाडून कोल्हापूरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास मोलाचे सहकार्य केल्याचे विशेषत्वाने नमूद करीत तशा प्रकारचे एक आभारपत्र त्यांनी सत्कारसमयी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या प्रतिमेसह प्रदान केले आहे.
अशाच प्रकारे महाड व चिपळूणमधील पथकांनीही उत्तम कामगिरी केल्याचे अभिप्राय तेथील स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दिलेले आहेत. चिपळणूच्या प्रभाग क्र. २ च्या नगरसेविका श्रीम. सीमा रानडे, निवृत्त नायब तहसिलदार वसंत कावले, व्यापारी असो. पदाधिकारी बुधाराम पगारे, एकविरा देवी मंदिर संस्था पदाधिकारी अशा अनेक स्तरांतील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या पध्दतीने मदतकार्य केले त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार २४ जुलै रोजी ४३ जणांचे व २५ जुलैला २० जणांचे मदतकार्य पथक महाडला तसेच २६ जुलैला ४० जणांचे मदतकार्य पथक कोल्हापूरला स्वच्छता साधनांसह कार्बेलिक पावडर, ब्लिचींग पावडर तसेच कोव्हीडच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशकाच्या स्प्रेईँग टीमसह पाठविण्यात आले होते. या पथकांनी मोठ्या प्रमाणावर साचलेला रस्त्यांवरील तसेच घरांतील गाळ सफाईचे काम केलेच शिवाय सफाई करून, रस्ते धुवून जंतुनाशक पावडरही टाकली. याशिवाय कोव्हीडच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईडचीही फवारणी केली.
अशाचप्रकारे २५ जुलैला डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफसह १५ जणांचे वैद्यकीय पथक चिपळूणला आणि २७ जुलैला २४ जणांचे वैद्यकीय पथक महाडला मोठ्या प्रमाणात औषधसाठ्यासह पाठविलेले होते. याही पथकांनी तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार औषधे दिली. यापैकी काही मदतकार्य पथके तेथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मदतकार्य करून परतली आहेत. त्यानंतरही चिपळूण येथील स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार २०६ स्वयंसेवकांची जम्बो मदतकार्य पथके तसेच १५ डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफचे वैद्यकीय पथक चिपळूणला पाठविण्यात आलेले असून त्यांनी तेथील मदतकार्यास व आरोग्य तपासणीस सुरूवात केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आपत्कालीन स्थितीमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे धावली आहे. पूर ओसरल्यानंतर तेथील स्वच्छता, आरोग्य स्थिती तातडीने हाताळणे अत्यंत गरजेचे असून त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास तत्पर प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक साधनसामुग्री, वाहने व औषधसाठ्यासह पथके पूरग्रस्त भागात रवाना केली आहेत. या पथकांच्या कामगिरीतून तेथील परिस्थिती सुस्थितीत आणण्यात महत्वाची मदत होत असून स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्याची प्रशंसा केली जात आहे.