नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग ७६ मधील महिलांसाठी रक्षाबंधनाचा जाहिर सोहळा आयोजित केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच आजही रेल्वे सर्वासाठी खुली नसल्याने भावाला बहीणीकडे जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाऊ येणार नसल्याने बहीणीच्या चेहऱ्यावरील नाराजी दूर करण्यासाठी पांडुरंग आमले हे स्वत: प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून रक्षाबंधन करून घेणार आहेत. गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या काळात त्यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून जाहिररित्या रक्षाबंधन करून घेतले होते. काही दिवसापूर्वीच आषाढी वारीचे आयोजन करताना भाविकांना, वारकऱ्यांना पांडुरंग आमले यांनी परिसरातच दिंडीमध्ये सहभागी होण्याचे तसेच विठू माऊलीचे दर्शन घडविण्याचे कार्य केले होते.
ज्या बहीणींचा भाऊ कोरोना अथवा अन्य कारणास्तव बहीणीकडे येवू शकणार नाही अथवा ज्या महिलांना भाऊ नाही, त्या महिलांचे भाऊ बनण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.