संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रक्षाबंधन सणाच्या पावित्र्याचे औचित्य राखत नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात सफाई कामगारांसाठी आयोजित रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात पार पडला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली व कामगार नेते तसेच नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या काळात घरी न थांबता स्वत:च्या तसेच स्वत:च्या परिवाराच्या जिविताची तसेच आरोग्याची तमा न करता मागील दीड-पावणे दोन वर्षे दररोज सफाई कामगार ईमानेइतबारे आपले सफाई, रस्ता स्वच्छतेचे, कचरा संकलनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या सेवाभावी प्रवृत्तीची दखल घेत या सफाई कामगारांसाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. भाऊ ज्याप्रमाणे बहीणीसाठी अडचणीच्या काळात धावून येतो, त्याप्रमाणे सफाई कामगारांनी भावासम पाठीशी राहत स्वच्छतेचे कार्य करत रोगराईपासून नवी मुंबईकरांना लांब ठेवले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या कोकण भागाची व कोल्हापुर भागाची आपल्या सफाई कामगारांनी सेवा केली. त्यामुळे त्यांच्या समर्पण वृत्तीचा आदर राखण्यासाठी सफाई कामगारांना राखी बांधण्यात आली असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक विद्या भांडेकर यांनी दिली.
नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात विद्या भांडेकर यांच्यासमवेत सौ. मंगल बागडे, सौ. शालन वाघमारे, सौ. कल्पना संतोष गवारे, सौ. नीलम वाघमारे, सौ. मृणालिनी बागडे , सौ. अनिता गांगुर्डे , सौ. जयश्री बागडे , सौ. हिरे यांनी सफाई कामगारांचे रक्षाबंधन केले. सफाई कामगारांना यावेळी मिठाई व मास्कचे वाटप केले. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाची पालिका कामगार वर्तुळात चर्चा सुरू होती.