नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती मागवून अहवाल मागविण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडी प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
राज्यात संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पर्यायाने दयनीय अवस्था झालेली आहे. मुळात पावसामुळे रस्त्यांची अवस्था ही पाऊसामुळे नाही तर रस्त्यांच्या डागडूजीकडे प्रशासनाने दाखविलेल्या उदासिनतेमुळे तसेच रस्ते कामात निकृष्ठपणा दाखविल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांना अखेरचा श्वास मोजावा लागण्याची वेळ आली आहे. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवाला जाताना कोकणवासियांना सरकारी कृप्पेमुळे खड्डेमय रस्त्यांतूनच पाठीला व मणक्यांना त्रास सहन करत ये-जा करावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल याची ठोस शाश्वतीही कोणी देत नाही. दरवर्षी कोकणातील रस्ते वाहून जातात, कधी रस्त्यावरील पुल वाहून जातात, रस्त्यावर खड्डे मोठे पडलेले असतात. कोकणवासियांनी असे कोणते पाप केले आहे की त्यांना चांगले रस्ते सरकार उपलब्ध करून देवू शकत नाही. ठाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. ठाणे जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे वाहतुक कोंडी नेहमीचीच समस्या झालेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने विशेष समिती नेमावी. तीन महिन्याची मुदत देत सरकारने समितीकडून आहवाल मागवावा आणि जानेवारी ते मे या ५ महिन्याच्या कालावधीत या चारही जिल्ह्यातील रस्ते सुसज्ज व व्यवस्थित करावे. या चार जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी लवकरात लवकर विशेष समिती नेमण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.