राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांच्यासोबत आयोजित केलेली बैठक
स्वाती इंगवले : (९८२००९६५७३ केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या विकास कामांबाबत खासदार राजन विचारे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक आयोजित केली. बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपजिल्हाधिकारी सुदाम परदेसी, उपविभागीय अधिकारी शिंदे, मिरा भाईंदर अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख, तहसीलदार तवटे, जिल्हा नियोजन अधिकारी खंदारे तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कांदळवन कक्ष, नवी मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पतन अभियंता, खारभूमी विकास विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, एमआयडीसी, मध्य रेल्वे, एम आर व्ही सी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, तहसीलदार, एम एम आर डी ए पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार महसूल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, तसेच सिडको अशा इतर अनेक विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत सर्वप्रथम नवी मुंबईतील गेल्या अनेक वर्षांपासून या खाडीकिनारी मच्छीमारी करणाऱ्या आगरी कोळी बांधवांच्या तलावातील गाळ काढण्याची परवानगी न दिल्याने त्यांच्या उपजीविकेचं साधन बंद झालेले आहे. या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना वस्तुस्थिती सांगताना २०१८ पासून मी याचा पाठपुरावा करीत आहे. त्यावेळचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन चे वासुदेवन यांच्याकडे या संदर्भात अनेक बैठका आयोजित करून पत्रव्यवहार करण्यात आला होता. व त्यामध्ये एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आजतागायत या बैठकीचे गठन करण्याची कार्यवाही कांदळवन कक्ष अधिकाऱ्यांकडून न झाल्याने नवी मुंबईतील आगरी कोळी मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून तुमच्या कांदळवन कक्ष विभागामार्फत तामिळनाडू येथे मच्छिमारांना योजना राबविल्या जातात. मग या ठिकाणी तुम्ही गाळ काढण्याची बंदी घालता कितपत योग्य आहे. असा सवाल अधिकाऱ्यांना केला त्यावर उपस्थित असलेले कांदळवन कक्षाचे राजेश मुकादम या अधिकाऱ्यांनी येत्या २ महिन्यात समिती गठीत करून गाळ काढण्याची परवानगी आम्ही देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना जिल्हाधिकार्यांच्या समवेत करण्यात आले.
ऐरोली कळवा या एलिव्हेटेड रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत विचारणा केली असता १०८० घरे भाईंदर पाडा येथे देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतलेला आहे. त्यापैकी ९२५ नागरिकांची ओळखपत्र प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. व उर्वरित स्थानिकांच्या विरोधामुळे होऊ शकलेली नाही. तसेच सन २०२२ मध्ये दिघा स्थानकाचे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती देण्यात आली.
ऐरोली येथे कांदळवन परिसरात किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीतून कामे केव्हापासून सुरू होणार याची विचारणा केली असता सल्लागाराची नुकतीच नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये तरतूद केल्या नंतर कामे सुरू होतील असे कळविण्यात आले.
घणसोली मधील गवळीदेव व सुलाईदेवी या पर्यटन क्षेत्राच्या विकासाबाबत विचारणा केली असता सदर रिजनल ऑफिस नागपूर येथे पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती देण्यात आली.
इलठण पाडा येथील ब्रिटिश कालीन डॅम धोकादायक झाल्याने त्याच्या डागडुजीसाठी रेल्वेने नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी विचारना केली असता नवी मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव रेल्वेला सादर न केल्याचे सांगण्यात आले तरी पुन्हा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
कांदळवन असलेल्या जागेतून घणसोली ऐरोली या नावाने होणाऱ्या जोड रस्त्यासाठी कांदळवन कक्ष विभागास पर्यायी जमीन मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पत्रव्यवहार बाबत विचारणा केली असता सदर प्रस्तावाबाबत सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
ठाणे शहरातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत सुरू होणाऱ्या जेटीच्या कामांच्या स्थिती बाबत विचारणा केली असता सदर पहिल्या टप्प्यात डोंबिवली कोलशेत काल्हेर व मीरा भाईंदर या ठिकाणी जे टी चे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. नुकताच केंद्र शासनाच्या सागरमाला या विभागाने १०० कोटीच्या कामास परवानगी देण्यात आली अशी माहिती देण्यात आली आहे.