संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातम्यांसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने सबका साथ देणारा पक्ष असल्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेसमध्ये केले जाते. सर्वांच्या विकासाठी झ़टणारा काँग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
टिळक भवन येथे अहमदनगर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विविधमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय बनसोडे, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर, सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, भाईजान आदि उपस्थित होते.
अहमदनगर शहर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, समाजवादी पार्टीचे शहर संघटक शेख मोहम्मद हनीफ जहागीरदार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण विश्वनाथ कोडम, भारिप बहुजन महासंघाचे भिंगारचे माजी शहराध्यक्ष सागर दत्तात्रेय चाबुकस्वार यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. लोकशाही, संविधान यांना संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. परंतु भारत हा लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. दोन वर्षात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अनेक संकटांचा सामना करत विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अतिवृष्टी, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीपोटी भरपाई दिली, कोरोना संकटावर चांगल्या प्रकारे मात केली. मविआ सरकार लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहे म्हणूनच विधान परिषद निवडणुका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला जनतेने मोठा प्रतिसाद दिला, असे थोरात म्हणाले.