संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असता त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीच्या समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. आयुक्तांनीही त्यास तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत पदोन्नतीबाबत संबंधितांना निर्देश दिले. अजूनही काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचाही विषय तातडीने मार्गी लावण्याचे साकडे या बैठकीत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्तांना घातले.
कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका मुख्यालयात स्वच्छता निरीक्षक, वाहन विभागातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, प्रत्यके विभागातील संघटनेचे मुख्य पदाधिकारी यांच्यासमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली. बैठकीच्या सुरूवातीलाच कर्मचारी व अधिकाऱ्यांना जाहिर केलेल्या २५ हजार या सानुग्रह अनुदानरूपी बोनसबाबत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानले. रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाकडे कर्मचारी व अधिकाऱ्यांना या वर्षी ४० हजार रूपये बोनस देण्यासाठी लेखी तसेच प्रत्यक्ष भेटीगाठीतून पाठपुरावा सुरूच ठेवल होता, परंतु कोरोना महामारी व अन्य कारणे सांगत पालिका प्रशासनाने ४० हजार बोनसबाबत असमर्थता व्यक्त करत पुढे नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन रवींद्र सावंत यांना दिले.
कामगारांच्या बोनसबाबत नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याससाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यंदा महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना २५ हजार रूपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना १९ हजार रूपये व आशा वर्कर यांना ९ हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केल्याची माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली. यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी – कर्मचारी यांना २५ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना १९ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने या बैठकीत देण्यात आली.
पदोन्नतीबाबत आयुक्तांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी त्यांचे आभार मानले असून काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा रखडलेला पदोन्नतीचाही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी या बैठकीत रवींद्र सावंत यांनी केली. आयुक्तांनी त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन रवींद्र सावंत व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाला दिले.