संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोव्हीड १९ लसीकरणाकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी सुरूवातीपासूनच विशेष लक्ष देत लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळेच १८ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर ठरले आहे. आत्तापर्यंत १८
वर्षांवरील ११ लक्ष ७ हजार २३३ नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे म्हणजेच १००.०२ टक्के लसीकरण झालेले आहे. हा दावा आज नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुपारी महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या फेसबुकवर व प्रसिध्दी माध्यमांकडे पाठविण्यात आलेल्या मेलद्वारे करण्यात आला आणि नवी मुंबईकरांकडून पालिकेच्या या दाव्याची खिल्ली उडविण्यात येवू लागली आहे. महापालिका प्रशासनाच्या फेसबुकवरच काहींनी मी अजून पहिली लस घेतलीच नाही असेही सांगितले आहे. पहिला डोस शंभर टक्के घेतला हे कोणी तपासले अशीही विचारणा काही लोकांकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ज्यावेळी रूग्णवाहिकांतून मिशन कवचकुंडल अंर्तगत लसीकरण सुरू झाले, त्यामध्येही पहिला डोससाठी अनेक जण आले होते. आजही अनेक गृहनिर्माण सोसायट्या, चाळी, टॉवर, गावठाणातील इमारतींमध्ये, एलआयजीमध्ये अनेकांनी पहिला डोस घेतलेला नसल्याचे सोशल मिडियावर सांगण्यात येत आहे. त्यामुळे शंभर टक्के पहिला डोस लसीकरणाचा या प्रसिध्दीवरच आता प्र्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहे. महापालिकेच्या स्वच्छता अभियानावरही यानिमित्ताने काहींनी टीका केली आहे. स्वच्छता अभियान केवळ शहराच्या बाहेरील रस्त्यावरच राबविले जाते., अंर्तगत भागात कचऱ्याचे ढिगारे तसेच असतात. रंगरंगोटी बाहेरूनच होते. आतील भागात मागणी करून पाठपुरावा केल्यावरच होत असते. ज्या गावांवर नवी मुंबई वसली, त्या गावानांच या अभियानातून वगळले जात असल्याचा संतापही काही ग्रामस्थांकडून व्हॉटसअप ग्रुपवर व्यक्त करण्यात आला आहे. शहरात अनेकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला नसतानाही पालिका प्रशासनाकडून कोणत्या निकषावर दावा करण्यात आला अशी खिल्लीही पालिका प्रशासनाची उडविली जात आहे.