मुंबई प्रतिनिधी : अमित वाघ
८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : शाहरुख खानचा सुपुत्र आर्यनला अखेर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, गेल्या २५ दिवसांपासून ड्रग्जप्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेला आर्यन खान आता लवकरच तुरुगांबाहेर येणार आहे. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली असून दिवाळीपूर्वीच फटाके फोडले जात आहेत. आर्यनच्या स्वागताचे बॅनरही झळकले आहेत.
आर्यन खानला आज जवळपास तीन आठवड्यांनंतर कोर्टानं जामीन दिल्यावर मन्नतवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी देशातल्या दिग्गज वकीलांची फौज उभी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज त्याला जामीन मिळाल्यानंतर शाहरूखने सतीश मानेशिंदेंसह वकीलांच्या टीमची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय.
आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. मात्र, आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि प्रोसिजर फॉलो करावी लागत असल्याने आर्यनचे आज तुरुंगातून बाहेर येणे जरा कठीणच आहे. मात्र, शाहरुखच्या घराबाहेर जल्लोष सुरू असल्याचं दिसून येत आहे.
शाहरुखच्या चाहत्यांनी फटाक्याची माळ उडवून, वेलकम प्रिन्स आर्यन अशी बॅनरबाजी करुन आर्यनच्या स्वागताची तयारी केली आहे. चाहत्यांच्या गर्दीचे, आनंदाचे व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. ट्विटरवर आर्यन खान बेल, आणि ब्लास्ट हे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. एकंदरीत, आर्यनच्या घराबाहेर आजच दिवाळी साजरी होत असल्याचं दिसून येतंय.
मुलगा आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर समोर आलेल्या पहिल्या छायाचित्रांमध्ये, सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या वकिलांच्या टीमसोबत आनंदात दिसला. एका छायाचित्रात त्यांची व्यवस्थापक पूजा ददलानीही दिसली आहे. वकील सतीश मानेशिंदे आणि त्यांची टीम आर्यन खानच्या बचाव पक्षाचा एक भाग होते, ही टीम आर्यनला जामीन मिळवण्यासाठी तीन आठवड्यांहून अधिक काळापासून काम करते आहे.