नवी मुंबई : २८ ऑक्टोबर २०२१ रोजी मूषक नियत्रंण कामगारांच्या खात्यात वेतन जमा करण्याबाबत महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले असतानाही मूषक नियत्रंणच्या ठेकेदाराने कामगारांचे वेतन न दिल्याने आयुक्तांच्या निर्देशाला मूषक ठेकेदाराकडून केराची टोपली दाखविण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी दिली आहे. मूषक नियत्रंण कामगारांच्या खात्यात केवळ बोनस जमा झाल्याचे व वेतन जमा न झाल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी लेखी निवेदनातून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांस निर्देश दिले आहेत. त्यासोबतच महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत कंत्राटी कामगार तसेच ठेकेदाराकडील कर्मचारी यांचीही दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने आयुक्तांनी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता विहित मुदतीत बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन २८ ऑक्टोबरपूर्वी अदा करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. याबाबत वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिध्द झाल्या. परंतु २८ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागातील कामगारांच्या खात्यात केवळ बोनस जमा झाला आहे. वेतन जमा झालेले नाही. महापालिका आयुक्तांनी आदेश देवूनही मूषक नियत्रंण विभागाच्या ठेकेदाराकडून या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. या मूषक कामगारांची नेहमीच ठेकेदाराकडून आर्थिक ससेहोलपट होत असून वेतन विलंबाने होत असते. किमान दिवाळीसाठी तरी वेळेवर होणे आवश्यक आहे. ठेकेदार आपल्या सूचनांचे पालन करत नसेल व वेतन देत नसेल तर या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि वेतन विलंबाच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.