बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिघ्यात-खोदकाम करताना महानगर गॅस पाईल लाईनला धडक लागून आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोघे जण किरकोळ भाजले असून उभी असलेली एक चारचाकी गाडी जळाली आहे. या घटनेनंतर महानगर गॅस कंपनी, टोरंट, बीपीएल कंपनी आणि नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी यांचा समन्वय नसल्याने हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थांच्या गाड्या बिनधाकपणे उभ्या असतात.
दिघा येथील रिलायबल प्लाझा गेट समोरील रस्त्यावर ही आगीची घटना घडली आहे. सदर ठिकाणी केबल टाकण्यासाठी टोरंट कंपनीचे खोदकाम ८ नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतरही सुरु होते. त्यातच जमिनीखाली मशिनने ड्रिलिंग करुन बीपीएल कंपनीचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. या ठिकाणाहून जमिनी खालून गेलेल्या महानगर गॅस पाईप लाईनची माहिती नसल्याने खोदकाम करताना त्याला धक्का लागल्याने गॅस लिकेज झाला. टोरंटचे काम सुरु असताना वापरण्यात आलेले साहित्याने व केबलने पेट घेतल्याने आग पेटली. दुपारच्या सुमारास वर्दळ कमी असल्याने कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. ऐरोली अग्निशमक दल व एमआयडीसीच्या अग्निशमक दलाने घटना स्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
विशेष म्हणजे पोलिसांनी घटना स्थळी भेट घेतली, परंतु झालेल्या घटनेची नोंद नागरिकांनी सांगूनही घेतली नाही. पोलिसांनी काही तरी हात मिळवणी केली आहे, त्यामुळे तर साधी तक्रार ही दाखल केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.