नवी मुंबई : सानपाडा निवासी नोडमध्ये वाहणाऱ्या नाल्यामुळे डासांच्या त्रासात वाढ झाल्यामुळे सानपाडा सेक्टर ६,७,८ मधून जाणाऱ्या नाल्याची सफाई करण्याची मागणी भाजपचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
सानपाडा नोडमधील रहीवाशी वसाहतीमधील सेक्टर ६,७,८ मधून नाला जात आहे. या नाल्यामध्ये एमआयडीसीचे पाणी वाहत आहे. या नाल्यामुळे स्थानिक रहीवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. या नाल्यातून एमआयडीसीतील दूषित, रासायनिक पाणी वाहत आहे. नाला अनेक ठिकाणी चोकअप झालेला आहे. या नाल्यामुळे डासांचा त्रास वाढीला लागला असून सेक्टर ६,७,८ मधील रहीवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. पालिकेने निवासी परिसरात धुरीकरण केले तरी फारसा फायदा होत नाही. मुळातच नाल्याची दोन महिन्यातून एकदा तळापासून सफाई करणे आवश्यक आहे. नाल्यात तुंबलेला कचरा, माती काढून टाकण्यात यावी. पाणी वाहते राहील. वाहत्या पाण्यात दुर्गंधी कमी होवून डासांचा त्रासही कमी होईल. सध्या या नाल्यामुळे डासांचा त्रास वाढल्याने तीनही सेक्टरमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. आपण स्थानिक रहीवाशांच्या जिविताची काळजी घेण्यासाठी या नाल्याची तात्काळ तळापासून सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी भाजपचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.