नवी मुंबई : मूषक नियत्रंण कामगारांचे मार्च, एप्रिल या दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने मिळणेबाबत तसेच या कामगारांच्या वेतनवाढीतील फरक (एरियस) कामगारांना त्वरित देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
आज मे महिन्याची दहा तारीख असतानाही पालिकेत काम करणाऱ्या मूषक नियत्रंणाचे काम करणाऱ्या कामगारांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. महापालिकेत काम करणाऱ्या कायम कर्मचारी व अधिकारी, ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी कामगारांचे सर्वांचेच वेतन झालेले आहे. मात्र केवळ आणि केवळ मूषक नियत्रंणाचे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन झालेले नाही. गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनात वेतन विलंबामुळे आर्थिक ससेहोलपट केवळ मूषक नियत्रंण कामगारांचीच होत आहे. एकाच ठेकेदाराला वर्षानुवर्षे ठेका व ठेकेदाराकडून नेहमीच दोन ते चार महिने वेतन विलंब करून कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन न झाल्याने या कामगारांच्या घरावर सुतकी अवकळा पसरलेली आहे. मे महिन्याचे सुट्टीत हातात पैसे नसल्याने अनेकांना आपले परिवार गावी पाठविणे शक्य झालेले नाही. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना या मूषक नियत्रंण कामगारांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
या कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीतील फरक महापालिका प्रशासनाकडे बाकी आहे. प्रशासनाने या एरियस ठेकेदाराकडे सुपुर्द केला असल्याची महापालिका मुख्यालयात चर्चा जोरदार सुरू आहे. आपण याप्रकरणी चौकशी करून कर्मचाऱ्यांना हा एरिअस लवकरात लवकर देण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत. वेतन विलंबामुळे मूषक नियत्रंण कामगाराने अथवा त्यांच्या परिवारातील कोणी आत्महत्या केल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील आणि महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
या समस्येबाबत संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.