अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार परिसरात कमी दाबाने व कमी वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले होते. रहीवाशांनी कॉंग्रेस कार्यालयात येवून याविषयी तक्रारी केल्या. याची दखल घेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पालिका प्रशासनाने जलवाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वॉल बसविल्याने नेरूळ सेक्टर चारची पाणीसमस्या संपुष्ठात येणार आहे. स्थानिक रहीवाशांनी याबाबत कॉंग्रेस कार्यालयात येवून विद्या भांडेकर व कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.
गेल्या काही महिन्यापासून नेरूळ सेक्टर चारमध्ये पूर्वीच्या तुलनेत कमी दाबाने पाणी येत होते. तसेच पाण्याची वेळही कमी करण्यात आली होती. त्यामुळे रहीवाशांना मोरबे धरण महापालिकेचे असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्येने त्रस्त होवून स्थानिक सिडको वसाहतीमधील तसेच वाधवा टॉवरमधील रहीवाशांनी कॉंग्रेसच्या कार्यालयात जावून कामगार नेते रविंद्र सावंत आणि कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्याकडे समस्या मांडल्या. विद्या भांडेकर यांनी महापालिका मुख्यालय, नेरूळ विभाग कार्यालय तसेच पाणीपुरवठा विभागातील उपायुक्त व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून निवेदन सादर करून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्या भांडेकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर चारमधील चौकात जलवाहिनीचा वॉल बदली करून तांत्रिक अडचणी दूर केल्या . पाणीपुरवठ्याची समस्या दूर केल्याने स्थानिक रहीवाशांनी कॉंग्रेस कार्यालयात जावून विद्या भांडेकर व रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.
काम कोण करतेय, पाठपुरावा कोण करतेय, पाण्याची समस्या कोणामुळे निर्माण झाली, पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कोणाच्या घरातले आहेत. याची स्थानिक जनतेला जवळून कल्पना आहे. श्रेय कोणीही घेतल्याने फरक पडत नाही. जनतेला सर्व माहिती आहे. समस्या संपल्याने जनतेच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आमच्यासाठी महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया विद्या भांडेकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.