अनंतकुमार गवई
नवी मुंबई : विषय : महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात होत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येचे तातडीने निवारण करण्याची मागणी कोपरखैराणे नोडमधील प्रभाग १९च्या भाजप पदाधिकारी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात गेल्या दोन-अडीच महिन्यापासून महापालिका प्रशासनाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने स्थानिक रहीवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सिडको वसाहती व एलआयजी परिसराचा, बैठ्या चाळींचा आणि रो-हाऊसेसचा समावेश होत असून येथील रहीवाशी अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील आहेत. येथील प्रत्येक घरामध्ये लोकसंख्येचे प्रमाणही जास्त आहे. महापालिका प्रशासनाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पालिका निर्मित पाणीटंचाईने रहीवाशी विशेषत: महिला वर्ग त्रस्त झाला आहे. स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही प्रभाग १९ मधील रहीवाशांना गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने व कमी वेळेपुरताच पाणीपुरवठा होत असल्याने रहीवाशी त्रस्त झाले आहे आणि दररोज पाण्याचे टॅंकर मागविण्याइतपत येथील रहीवाशी श्रीमंत नाहीत. प्रभाग १९ मधील करदात्या रहीवाशांना महापालिका प्रशासन स्वमालकीचे मोरबे धरण असताना आणि धरणात पाणीसाठा असतानाही किमान पाण्याची गरज पालिका प्रशासन भागवू शकत नाही, ही प्रभाग १९ मधील रहीवाशांची शोकांतिका असल्याचे सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रभाग १९ मधील स्थानिक रहीवाशांनी याबाबत आमच्या कार्यालयात तक्रारीही केल्या आहेत. रहीवाशांना पाणी पुरत नसल्याने ते त्रस्त झाले असून पालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. पालिका प्रशासनाच्या अडीच हजार कोटींच्या ठेवी आम्हाला भूषणावह नाही, तर किमान पाणी समस्या सोडवून माफक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी आता स्थानिक रहीवाशांकडून टाहो फोडला जात आहे. पाणी वापराबद्दल नियमितपणे पाण्याचे देयक प्रशासनाकडे भरत असतानाही ही कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा स्थानिक रहीवाशांनी काय अर्थ घ्यायचा? प्रभाग १९ मधील रहीवाशांना उच्च दाबाने पाणीपुरवठा करून निर्माण होत असलेली पाणीटंचाई संपुष्ठात आणण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.