नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये असणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ उद्यानातील खेळणी दोन वर्षापासून तटुली आहेत, काही गायब झाली आहेत. दोन वर्षात पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही खेळण्यांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याने लहान मुलांने खेळणे शक्य होत नाही. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी बुधवारी रात्री उद्यानात खेळण्याच्या डागडूजीसाठी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.
महापालिका प्रशासनाने या ‘राजमाता जिजाऊ उद्याना’च्या डागडूजीकडे गेल्या काही वर्षात लक्षच न दिल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. खेळण्याचा बदक तर नेहमीच गायब असतो. झोपाळे सतत तुटलेले असतात. यासह मॉर्निग वॉकचे पदपथावरीला लाद्या निखळणे, सुरक्षा रक्षक नसणे यासह उद्यानातील अनेक समस्या निवारणासाठी राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी सतत पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने खेळण्यांची दुरूस्ती अथवा उद्यानातील अन्य समस्या निवारणासाठी कधीही स्वारस्य दाखविला नसल्याचा व लेखी निवेदनाचा रतीब टाकूनही दखल न घेतल्याचा आरोप महादेव पवार यांनी केला आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील स्थानिक रहीवाशी व सारसोळे गावातील ग्रामस्थांच्या मुलांच्या खेळण्यासाठी पालिका प्रशासन लक्ष द्यावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बुधवारी सांयकाळी उद्यानातच भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून जमा होणारा पैसा पालिका प्रशासनाला खेळण्याच्या डागडूजीसाठी देणार असल्याचे महादेव पवार यांनी सांगितले. पालिका प्रशासनाकडून उद्यानाचे कामासाठी निविदा काढल्याचे सांगण्यात येत असले तरी काम पूर्ण होण्यासाठी सहा ते आठ महिने लागणार, तोपर्यत मुलांची खेळण्यासाठी कोंडी करायची काय? काम पूर्ण होईपर्यत खेळण्यांची तात्पुरती डागडूजी करा. त्याचा दुरूस्तीचा खर्च आम्ही करतो असे वारंवार सांगूनही महापालिका प्रशासनाने सहकार्य न केल्याने आजचे भीक मांगो आंदोलन केल्याची माहिती महादेव पवार यांनी दिली.
स्थानिक रहीवाशी विशेषत: उद्यानात असणाऱ्या महिलांनी या आंदोलनात सहभागी होत तुटलेली खेळणी व उद्यानातील अन्य समस्यांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या आंदोलनात सहभाग नोंदविला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्यासह वॉर्ड अध्यक्ष यशवंत मोहीते, प्रमोद शेळके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणिस प्रशांत सोळस्कर, रविंद्र सुर्वे, रोहन वाघ व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.