अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये कोव्हिड संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी असलेली बायोमेट्रीक प्रणाली बंद करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि परिवहन उपक्रमाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.
सध्या पुन्हा एकवार नवी मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईत कोरोनाचे सरासरी ३०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका मुख्यालयात व अन्य ठिकाणी कर्मचारी व अधिकाऱ्यांना हजेरीसाठी बायोमेट्रीक प्रणाली आहे. कोरोनाचे पुन्हा वाढीस लागलेले प्रमाण पाहता बायोमेट्रीक प्रणाली कोरोना संसर्ग वाढीस हातभार लावण्याची भीती आहे. जोपर्यत कोरोना आहे, तोपर्यत महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना हजेरीसाठी बायोमेट्रीक कार्यप्रणालीचा वापर करू नये आणि तशा आशयाचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.