नवी मुंबई : शिवसेना आमदारांच्या घडामोडींमुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उद्रेक निर्माण झाला असून सर्वच बंडखोरांप्रती उघडपणे संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत व श्रध्दास्थान असणाऱ्या उध्दव ठाकरेंना आजारपणात त्रास देणाऱ्या शिवसेना आमदारांप्रती शिवसैनिक वेगळ्या भाषेत उल्लेख करताना त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देत आपला संताप व्यक्त करत शिवसैनिक अजून संपला नसल्याचे घोषणांतून सांगत आहेत. शांतताप्रिय असा महाराष्ट्राच्या राजकारणात उल्लेख असणाऱ्या नवी मुंबईतील शिवसैनिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटण्यास सुरूवात झाली असून बंडखोरांचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेविरोधात आपला संताप व्यक्त करू लागले आहेत.
नवी मुंबईतील कडवट शिवसैनिक व माजी नगरसेवक तसेच शिवसेना उपशहरप्रमुख सतीशदादा रामाणे यांनी आज सकाळी शिवसेना शाखेवर असलेल्या फलकामधील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासून आपला संताप व्यक्त केला आहे . सतीशदादा रामाणे यांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासणारे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून अल्प वेळेतच महाराष्ट्रभर व्हायरल झाला असून याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटण्याची शक्यता आहे. शिवसेना शाखा क्रं ९६ वरील शिवसेनेच्या फलकावर शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. आज सकाळीच शाखेत येवून सतीशदादा रामाणे यांनी शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले. नवी मुंबईत असे कृत्य करणारे सतीशदादा रामाणे पहिले शिवसैनिक ठरले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या कृत्याचा निषेध करत सतीशदादा रामाणे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रिक्षा चालवणाऱ्याला शिवसेनेने खूप काही दिले असताना जे घडले ते चुकीचे आहे. दोन वर्षे कोरोनामुळे व नंतर सहा महिने आजारपणामुळे उध्दवसाहेबांशी संपर्क करणे अवघड जात असले तरी उध्दवसाहेबांनी कोरोना काळात शिवसेना शाखाशाखांशी संपर्क ठेवला होता. सर्वसामान्य शिवसैनिकांचीही विचारपुस केली होती. आजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते स्वत:कडे ठेवले होते. उध्दवसाहेबांनी ते एकनाथ शिंदेंना दिले. पाहिजे ती पदे दिली. अजून काय करायला पाहिजे यांच्यासाठी? आमदार गेले तरी शिवसैनिक उध्दवसाहेबांसोबत आहेत. शिवसैनिक उध्दवसाहेबांची कधीही साथ सोडणार नाहीत. घडलेल्या घटनेचा निषेध करून जे गेलेत, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेला स्मरून पुन्हा परत यावे असे आवाहन सतीशदादा रामाणे यांनी यावेळी केले. सतीशदादा रामाणे यांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासल्याच्या घटनेची महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.