२३८ लोकांचा सहभाग, १३ जणांची रक्ततपासणी
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमी प्रभाग ३४ मधील सारसोळे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांचा साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी महापालिका प्रशासनातील आरोग्य विभागाच्या कुकशेत नागरी आरोग्य केंद्राकडून जनजागृतीपर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ ते सांयकाळी १२.३० या वेळेत झालेल्या या शिबिरामध्ये २३८ जणांनी सहभाग नोंदविला. या लोकांची जनजागृती करण्यात आली. १३ जणांनी आपली रक्ततपासणी करून घेतली. कुकशेत नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय यमगर, आरोग्य सहाय्यक पांडुरंग खांदोडे, आरोग्यय सेवक कुणाल खैरे यांनी या शिबिरात सहभागी रहीवाशांना व ग्रामस्थांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन केले. लोकांना साथीच्या आजाराबाबतची माहिती होण्यासाठी माहितीपत्रकही वितरीत करण्यात आले.
सोसायटी आवारातील भंगार साहित्य, अडगळीचे साहित्य, टेरेसवरील पाण्याची टाकी, पाणी साठवणूकीसाठीचे पिंप, फुलदाण्या, कुंड्या या ठिकाणी पाणी साचून डास अंडी घालतात. लारव्हा सापडतात. यामुळे साथीच्या आजाराचा उद्रेक होतो. आजार झाल्यावर काय करावे आणि आजार होवू नये यासाठी काय करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच नेरूळ सेक्टर ८ व कुकशेत गावात जनजागृतीपर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पावसाळ्यात साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव व कुकशेत गावासाठी तीन ठिकाणी जनजागृतीपर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याची मागणी स्थानिक रहीवाशी व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना १५ जुन २०२२ रोजी लेखी निवेदन सादर केले होते व त्यानंतर पाठपुरावाही केला होता.