अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए येथील महापालिका शाळा क्रं ९ या ठिकाणी ‘सीबीएसई’शाळा सुरु करण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासन नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळ सीबीएसई अभ्यासक्रमाच्याही शाळा सुरू करत आहे, ही खरोखरीच प्रशंसनीय व स्तुत्य बाब आहे. नेरूळ सेक्टर १६ए येथे महापालिकेची शाळा क्रमांक -९
कै वत्सला रामा भगत शाळा ही आहे. या शाळेत सीबीएसईची शाळा सुरू करण्यासाठी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहे.
या ठिकाणी सीबीएसईची शाळा सुरू झाल्यास नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८, १८ ए, २४, नेरूळ गाव, सेक्टर १० येथील रहीवाशांनाही त्याचा फायदा होईल. गोरगरीब व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशी इच्छा असूनही पैशाअभावी मुलांना सीबीएसईच्या शाळेत शिक्षण देवू शकत नाहीत. त्यामुळे पालिका शाळांमध्ये सीबीएसई शाळा सुरू केल्याने गोरगरीबांच्या, अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांनाही आपल्या पाल्यांना शिक्षण देणे सोयीचे होईल. त्यामुळे आपण नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८, १८ ए, २४, नेरूळ गाव, सेक्टर १० येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित जोपासण्यासाठी नेरूळ सेक्टर १६ ए येथील महापालिका शाळा क्रं ९ कै वत्सला रामा भगत शाळा या ठिकाणी सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.