अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३,२४,२५ मधील अंर्तगत व बाहेरील रस्त्यांची तातडीने डागडूजी करण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या तीन-चार दिवसापासून नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. या पहिल्याच पावसात जुईनगर सेक्टर २३,२४,२५ मधील रस्त्यांची दुरावस्था उघडकीस आली असून करदात्या नागरिकांना या रस्त्यांवरील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण उखडले गेले असून पाण्यात वाळू व डांबरीकरण वाहून जात आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे येथून वाहने नेताना वाहनचालकांना व आतील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गाडी खड्ड्यात आदळल्याने पाठीला व मणक्याला मार बसत असल्याच्या तक्रारीही स्थानिक रहीवाशांनी आमच्या कार्यालयात येवून केल्या आहेत. जुईनगर सेक्टर २३, २४, २५ मधील अंर्तगत व बाहेरील रस्त्यांची तातडीने डागडूजी न केल्यास अवघ्या पंधरा ते वीस दिवसात येथील खड्ड्यांचे प्रमाण वाढून डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले पहावयास मिळेल. या ठिकाणी अपघात होण्याचीही भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना तातडीने जुईनगर सेक्टर २३,२४,२५ मधील रस्त्यांची डागडूजी करण्याचे व खड्डे बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.