नवी मुंबई : ठेकेदार नेहमी बदली होतात, कामगारांचे शोषण करतात, कामगारांचे वेतन थकवून अर्ध्यातून पळून जातात. ठेकदार बदलत राहतात, पण वर्षानुवर्षे काम करणारे कामगार तेच असतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदार पोसण्याएवजी रूग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची सेवा कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणारे वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालय, नेरूळ – तुर्भे – ऐरोली व अन्य ठिकाणचे माता बाल रूग्णालय व इतर आरोग्य व्यवस्थेत इएमजी या ठेकेदार कंपनीकडून मनुष्यबळ व्यवस्थापन करण्यात येत आहे. अर्थात पालिका प्रशासनात वर्षानुवर्षे कधी ठोक मानधनावर तर कधी कंत्राटी तत्वावर कर्मचारी काम करत असतात. ठेकेदार बदली झाला तरी कर्मचारी तेच असतात. पूर्वी बीव्हीजी ठेकेदार असताना कर्मचाऱ्यांना फारशा समस्यांचा सामना करावा लागत नसे. परंतु इएमजी ठेकेदार कंपनी आल्यावर विलंबाने वेतन भेटणे यासह अन्य समस्यांचा सामना रूग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. आता दोन-तीन महिन्यापासून रूग्णालयीन कर्मचाऱ्यांना इएमजी ठेकेदाराकडून वेतन देण्यात आलेले नाही. काही दिवसापासून या कंपनीची मशिनरी व अन्य साहित्यही दिसत नाही. त्यामुळे या ठेकेदाराने गाशा गुंडाळून पलायन केले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
एकीकडे दोन ते तीन महिने वेतन झालेले नसतानाचा ठेकेदाराबाबत उलटसूलट सुरु असलेल्या चर्चेने कामगारांच्या पोटात भीतीची गोळा उठला आहे. महागाईच्या काळात रूग्णालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणे ही पालिका प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी गंभीर बाब आहे. त्यामुळे इएमजी या कंपनीबाबत महापालिका प्रशासनाने चौकशी करून वेतन रखडविणे, अर्ध्यातून पळ काढणे (चर्चा) याविषयी संबंधित ठेकेदारावर महापालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच आरोग्य व्यवस्थेत सध्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. रूग्णालयीन कायम कर्मचारी आया-मावशी व अन्य संवर्गातील निवृत्त झाले आहेत. ठेकेदाराकडे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवरच या बहूउद्देशीय कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. पालिका प्रशासनाने रिक्त जागांच्या ठिकाणी नव्याने रूग्ण भरती न करता आहे त्याच सफाई कर्मचाऱ्यांची सेवा कायम करावी. या कर्मचाऱ्यांना रूग्णालयीन कामाचा अनुभव आहे. ठेकेदार पळून गेले तरी कर्मचारी वर्षानुवर्षे पालिका प्रशासनात काम करत आहेत. ठेकेदारांना पोसण्याऐवजी या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने कायम करणे आता गरज आहे. वेतन विलंबप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि पालिका तिजोरीतून संबंधित कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.