अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहामधील मल:निस्सारण वाहिन्यांतील चोकअप शीघ्रगतीने काढण्याचे संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहिवाशांची दुर्गंधीतून मुक्तता करण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
निवेदनात संदीप खांडगेपाटील पुढे म्हटले आहे की, नेरूळ सेक्टर सहामध्ये मल:निस्सारण वाहिन्या पूर्णपणे चोकअप झाल्या असाव्यात. आज सकाळी महापालिका समाजमंदीरासमोरच तसेच रिक्षा स्टॅण्डलगत असलेल्या राधाकृष्ण अपार्टंमेंटच्या बाजूला मल बाहेर रस्त्यावर विखुरलेले पहावयास मिळाले. तेथील रहीवाशांकडे चौकशी केली असता गेल्या १५ दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तेथून पुढे पायी चालत आल्यावर दर्शन दरबार मागील बाजूस असलेल्या इमारतीसमोरही तोच प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. तेथून पुढे आल्यावर गोदावरी सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या मल:निस्सारण टाकी उघडून काही लोक तपासणी करत असल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्या कदाचित चोकअप झाल्या असल्याने नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना शौचाच्या घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या सततच्या दुर्गंधीमुळे तसेच रस्त्यावर मल व अन्य सांडपाणी आल्याने जिवितासही धोका होण्याची भीती आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ या परिसरात रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्या सफाईचे निर्देश संबंधितांना द्यावेत व लवकरात लवकर सेक्टर सहामधील रहीवाशांची या समस्येतून मुक्तता करावी अशी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.