संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन साजरा केला जात असताना ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविला जात आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने आपल्या घरी तिरंगा झेंडा फडकवावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले असून याकरिता मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची गरज लागणार आहे. याकामी महिला संस्था व महिला बचत गट यांचा प्रत्यक्ष सहयोग लाभल्यास महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल, त्यांना रोजगार उपलब्ध होईल व राष्ट्रीय कार्यात त्यांचे सक्रिय योगदान राहील असे सांगत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी या संधीचा महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी करिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध स्तरांतून प्रयत्न करण्यात येत असून या अनुषंगाने विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित महिला बचत गट व संस्था यांच्या कार्यशाळेप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार, समाज विकास विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व सहाय्यक आयुक्त संजय तायडे, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे, समाजविकास अधिकारी सर्जैराव परांडे उपस्थित होते.
यावेळी प्रशासन विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार यांनी कोणत्याही कामात महिलांचा सहभाग असेल तर ते काम यशस्वी होते असे सांगत ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असा विश्वास व्यक्त केला. यावर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्त वेगळ्या जल्लोषात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवावयाचा आहे. यामध्ये प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
समाज विकास विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी महिला बचत गटांमार्फत तिरंगी झेंडे बनविणे कामात बचत गटांना महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य असेल असे सांगितले. १२” X १८” इंच आकारात खादी, स्पन, लोकर, सिल्क, पॉलिस्टर कापडाचे झेंडे बनवावयाचे असून कार्यशाळेप्रसंगी उपस्थित ९६ बचत गटातील महिलांना या राष्ट्राभिमानी कार्यात सक्रिय योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. याशिवाय ‘हर घर तिरंगा’ उपक्रम घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक महिला संस्था व महिला बचत गट प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुक्ताई महिला बचत गट ऐरोली यांच्या महिला प्रतिनिधींनी देशभक्तीपर गीत तसेच आई महालक्ष्मी बचत गट घणसोली यांच्या प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरणावर आधारित समुह गीत सादर केले.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविली जात असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तसेच सोसायटी, कार्यालय व संस्थांमध्ये ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वयंस्फुर्तीने तिरंगा फडकावयाचा आहे. आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची ही एक नामी संधी असून या निमित्ताने संपूर्ण देशभरात एकाच वेळी तिरंगा झेंडा फडकविला जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार आहे. तरी प्रत्येक नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.